Home महत्वाची बातमी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी अभ्यासाबरोबरच स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम उपयुक्त – प्राचार्य खैरे

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी अभ्यासाबरोबरच स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम उपयुक्त – प्राचार्य खैरे

212

चिंभावे हायस्कूलचे वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

रघुनाथ भागवत – महाड

रायगड , दि. १२ :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो. असे म्हटल्यास वावगे होणार नाही आणि म्हणूनच शाळा, शिक्षक, पालक यांच्याप्रमाणे विद्यार्थीदेखील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. सामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांसाठी स्नेहसंमेलन खूप महत्त्वाचे असते. विशेष मुलांमध्ये असलेल्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे त्यांना दैनंदिन जीवन कौशल्यामध्ये स्वावलंबी बनवणे आणि पुढील आयुष्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर करणे हे विशेष मुलांच्या शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट अंतिम ध्येय असते असे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर खैरे यांनी येथे प्रतिपादन केले.
चिंभावे येथील मु.दा. टोळ, माध्य विद्यालयाचे वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच पार पडले असून यावेळी ते बोलत होते. दोन दिवसीय या कार्यक्रमांमध्ये क्राफ्ट व चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, क्रीडास्पर्धा, कवायत व मनोरे, वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी बक्षीस समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. मा.ता.ए. सो.स्थायी समिती चेअरमन दिलीप शेठ, सहसचिव शांतीलाल मेथा, शाळा समिती सदस्य मिलिंद निगुडकर, सरपंच प्राजक्ता दळवी, उपसरपंच गणपत मालप, माजी सरपंच आरिफ उभारे, सदस्य दिनेश आखाडे, सुफियान समनाके, मुख्याध्यापक विनय शहा, शिक्षक व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रार्थना, गणेश वंदना, कोळीनृत्य-लोकनृत्य असे समूहनृत्य, छोटे नाटुकले आणि अधूनमधून चुटकुले असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती व टाळ्यांच्या गजरात प्रत्येक नृत्याला व सादरीकरणाला दाद मिळत होती.

मुलांना मुख्य समाजप्रवाहात आणणे व समाजाला या कार्याशी जोडणे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी त्यांचे शिक्षण, व्यवसायपूर्व प्रशिक्षण भविष्यातील त्यांचे आत्मनिर्भर होणे यासाठी जे काही विविध स्वरूपाचे प्रयत्न होतात ते या कार्यक्रमातून टप्प्याटप्प्याने साध्य होत आहे. आणि होईल असेच भाव यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.