महाड – रघुनाथ भागवत
रायगड , दि. १२ :- परतीच्या पावसाने हैदोस घातल्याने व प्रतिकूल हवामानाचा फटका बसून यंदा खाडीपट्टयातील तूर पीक धोक्यात आले आहे. ऐन पीक भरात असताना हिवाळ्याच्या थंड वातावरणाची आवश्यकता असताना हिवाळ्यातील गारवा कमी झाल्याने शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत तसेच फुलांची गळ होऊ लागल्याने या वर्षी उत्पादनात घट होण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे.
महाड तालुक्यातील खाडीपट्टा हा दुबार शेतीचा कोठार म्हणून ओळख असलेला परिसर आहे. तो सर्वात मोठे तूरपिका मुळेच, मात्र महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या रासायनिक कंपन्यांमधील निचरा झालेले रासायनिक सांडपाणी थेट आंबेत खाडीत सोडताना ते खाडीपट्ट्यातील ओवळे गावाच्या लगत सोडल्याने येथील दुबार शेती संपुष्टात आली आहे, काही नगण्य प्रमाणात होत असलेली दुबार शेती परतीच्या पावसाने यावर्षी हैदोस घातल्याने तसेच हिवाळ्यातील बदलत्या वातावरणामुळे दुबार शेतीतील मुख्य पीक तूर धोक्यात आले आहे, प्रामुख्याने बांधावर घेण्यात येणाऱ्या तूर पीक यावर्षी सर्वच संपुष्टात आले असून पूर्ण शेतभर करण्यात आलेल्या दूर पिकांमध्ये देखील उत्पादनात यावर्षी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
खाडीपट्टयात एकेकाळी तूर पिकाचे प्रमाण सर्वात मोठे होते. या ठिकाणी दुबार शेतीमध्ये तूर पिकाबरोबर पावटे व लाल पावटा तसेच चवळी अधिक कडधान्य पिके घेतली जात होती. सर्वात जास्त पीक घेणाऱ्या तुरीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. ख्रिस्त पूर्वी चारशे वर्षापूर्वी बौद्ध साहित्यात व तसेच चरक संहितेत ही तुरीचा उल्लेख आढळतो. कमी खर्चात सर्वाधिक प्रोटीन देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते, त्यामुळे जेवणात तुरडाळीचा समावेश सर्वाधिक असतो. तूर हे प्रामुख्याने आफ्रिकेतील पीक आहे असे सांगितले जाते मात्र नव्या संशोधनानुसार ते भारतीय पीक असल्याचे काहींचे मत आहे.
खाडीपट्टयातील चिंभावे, जुई, वलंग, रोहन, आदीस्ते, तेलंगे,ओवळे या गावांमधील शेतीत भातलावणीच्या दरम्यान साधारण जून ते जुलै महिन्यामध्ये भात पिकाबरोबरच भात शेतीच्याच बांधावर तुरीची पेरणी केली जाते, तर चोचिंदे, सव, शिरगाव आदी भागांमध्ये जुलैच्या नंतर तुरीची पेरणी केली जाते, तीसुद्धा पूर्ण शेतामध्ये पेरणी केली जाते. तूर या शेतीबरोबरच ताग व मुळ्याचे पीक देखील काही शेतकरी घेत असतात. तूर पिकासाठी पावसाचे प्रमाणात पाणी त्याच बरोबर हिवाळ्यामध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहून ही चांगली बहरते.
मात्र सध्या रासायनिक कंपन्यांच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याच्या फैलावामुळे गेली दोन दशके अगोदरची दुबार शेती केवळ सद्यस्थितीला १० ते १५ टक्के शिल्लक राहिली असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. कमी मेहनत आणि योग्य कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न देणारे हे तूर पीक असून बाजारमूल्य देखील चांगले असल्याने तूर शेतीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल असतो. सावित्री नदीचे पात्र खाडी स्वरूपाने तालुक्यात मोठे विस्तारलेले असून दासगाव खाडीसह पुढे आंबेत खाडीत मोठ्या स्वरूपाने मिळते पुढे हेच सावित्रीचे पाणी हरिहरेश्वरला समुद्राला मिळते. खाडीच्या नजीकच्या लगत हे दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.