सखाराम बोबडे पडेगावकर यांचा सवाल..!
समाजाच्या नावावर आमदार, खासदारकी आणि विविध राजकीय पक्षात महत्त्वाची पदे मिळवणारे नेते स्वतःचे तोंड उघडण्यासाठी आणखी किती मेंढपाळच्या हत्येची वाट बघणार ? असा सवाल धनगर समाज सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी समाजातील नेत्यांना विचारलाय .
भोकरदन जिल्हा जालना येथील निपाणी चिंचोली गावातील धनगर वस्ती वरील एका मेंढपाळाचा गाव गुंडांच्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान बुधवारी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. मेंढपाळाच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच समाजात संतापाची लाट निर्माण झाली. यावर पुढे बोलताना सखाराम बोबडे म्हणाले की धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे त्याची अंमलबजावणी झाली असती तर अनुसूचित जमाती कायद्या अंतर्गत आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करता आले असते. केवळ धनगर समाजाला संरक्षण आणि राजकीय व शैक्षणिक लाभ मिळू नये यासाठीच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. समाजाच्या नावावर आजपर्यंत बऱ्याच लोकांनी खासदार आमदार व मंत्री पदी भूषवली समाजाचा कार्यकर्ता ,नेता म्हणूनच विविध पक्षांनी त्यांना पक्षांतर्गत महत्त्वाची पदे दिली. पण या पदावर असणारे एवढी मोठी घटना होऊनही आज गप्पच आहेत. आणखी किती मेंढपाळांचे जीव गेल्यानंतर हे नेते सरकारला आपले तोंड उघडून जाब विचारणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. निपाणी चिंचोली येथील एका मेंढपाळाच्या हत्येनंतर नेतेमंडळी ताळ्यावर आली तर ठीक आहे, नाहीतर समाजातील युवक त्यांना जागा दाखवतील असा इशाराही त्यांनी दिला. धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने लवकरच यासाठी जनआंदोलन उभारले जाणार असल्याचेही शेवटी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सांगितले.