Home रायगड दाट धुक्यात हरवलेल्या वाटा वाहनचालकांना होत आहे अडथळा

दाट धुक्यात हरवलेल्या वाटा वाहनचालकांना होत आहे अडथळा

253

महाड – रघुनाथ भागवत

रायगड , दि. १२ :- गेली चार पाच दिवसापासून सर्वत्र पडत असलेल्या दाट धुक्यामुळे परिसरात धोक्याची चादर पसरल्याने वाटाही हरवल्या आहेत, तर धुके इतके दाट आहे की त्याचा जनजीवनावरही चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे.

यावर्षी दिवाळी सण व नोव्हेंबर महिन्यात थंडीचा अजिबात लवलेश जाणवला नाही, परंतु दिवाळी सणामध्ये न जाणवलेली थंडी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये देखील जाणवली नाही, मात्र इंग्रजी नव्या वर्षापासून वातावरणात बदल होऊन हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे., तर गेली चार-पाच दिवसापासून एकाकी थंडीने जोर धरला व बोचऱ्या थंडीत बरोबर दाट धुकेही पडण्यास प्रारंभ झाल्याने जनजीवनावर त्याचा चांगलाच परिणाम होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

दाट धुके आणि बोचरी थंडी यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी सकाळी व सायंकाळी शेकोट्या पेटू लागले आहेत. स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, घोंगड्या व ब्लॅंकेट या उबदार कपड्यांना ही बाजारामध्ये मागणी वाढू लागली आहे. रस्त्याने प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडल्यावर समोरचे काहीही दिसत नसल्याने वाहन चालविताना मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे. सकाळी सात वाजता सूर्य नारायणाचे होणारे दर्शन दहा वाजले तरी होत नसल्याने धुक्याची तीव्रता लक्षात येत आहे. दाट धुक्याच्या जोडीला जाणवणारी बोचरी थंडी यामुळे दिवसभर उबदार कपडे घालूनच वावरावे लागत आहे. वाढत जाणारी थंडी व पडत असलेले दाट धुके याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. तर लहान बालके, वयोवृद्ध मंडळी, आजारी असणाऱ्यांना मात्र या वातावरणाचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. खाडीपट्टयातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना पडणाऱ्या धुक्याशी सामना करून प्रवास करावा लागत आहे, त्याचा फटका अचानक समोरुन येणारे वाहन धुक्यामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यात या मार्गावरून दोनपदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याचे पुरते बारा वाजले असल्याने धुक्यात हरवलेल्या वाटेने प्रवास करणे आणखीनच धोकादायक वाटू लागले आहे. धुक्याबरोबरच थंडीचा सामना करीत वाटावरील वळणांना मागे टाकत प्रवास करणाऱ्या तरुणांना मात्र गुलाबी थंडीच्या आनंदाने चांगलीच हुडहुडी भरत आहे.