अमोलकचंद विधी महाविद्यालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन..यवतमाळ – भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला कायदेशीर सहायता मिळविण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र समाजातील अनेक वंचित, दुर्बल घटक केवळ कायद्याची माहिती नसल्यामुळे न्यायापासून वंचित राहतात. त्यामुळे कायद्याचे विद्यार्थी म्हणून शेवटच्या नागरिकापर्यंत कायदेशीर सहायता पोहोचवणे, हि आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री. एम. आर. ए. शेख यांनी केले. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, प्रा. डॉ. संदीप नगराळे तथा अॅड. संदीप गुजरकर स्थानापन्न होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ तथा अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि. ९ रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी समाजातील वंचित व दुर्बल घटकांना जिल्हा तथा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निशुल्क विधी सेवा उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी नागरिकांना कायदेविषयक सहायता मिळण्याबाबत मैलाचा दगड ठरलेल्या विविध न्यायालयीन निर्णयांवर विचारमंथन केले. तथा दुस-या सत्रात प्रमुख वक्ते अॅड. संदीप गुजरकर यांनी अंमली पदार्थामुळे पीडित व्यक्तींना विधी सेवा आणि ‘अंमली पदार्थाचे निर्मूलन योजना २०१५’ या विषयावर मुद्देसूद मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली फाळे तथा आभारप्रदर्शन प्रा. स्वप्नील सगाने यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी तथा न्यायालयीन कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.