संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार
परभणी – चारा टंचाईच्या काळात चारा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप करावे या मागणीसाठी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पशुधन विकास अधिकारी गंगाखेड यांना गुरुवारी लेखी निवेदन देण्यात आले.
सन 2018- 19 मध्ये चारा टंचाईच्या काळात शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे चारा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली होती. यात गंगाखेड मतदार संघातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. पशुधन अधिकारी गंगाखेड या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना चारा बियाणे मोफत वाटण्यात आले. चारा बियाणे सोबतच चारा पीक घेण्यासाठी अनुदान म्हणून प्रत्येक शेतकऱ्यास देण्यात येणारे रोख अनुदान मात्र आज पावोतो मिळाले नाही. यासाठी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने 19/ 7 /2019 रोजी निवेदन दिले होते. याच विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी धनगर साम्राज्य सनेचच्या वतीने आज गुरूवारी पशुधन विकास अधिकारी डॉ संजय पुराणिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सखाराम बोबडे यांचे सह डॉ अली, डॉ खान, नारायण बोमशेटे आदी शेतकरी उपस्थित होते.