योगेश कांबळे
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा
वर्धा, दि 21 (प्रतिनिधी):- पोलीस आणि महसूल विभागाने जिल्ह्यातील रेती चोरी, आणि अवैधपणे सुरू असलेली मद्यविक्री याबाबत संयुक्तपणे कडक कारवाई करून त्याला पायबंद घालावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात गृहमंत्री श्री देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व व्यवस्थेचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील रोहिणी रेतिघाट येथून मोठ्या प्रमाणात रेतीचोरी होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. रेतीचोरी पूर्णपणे थांबविण्यासाठी महसूल, पोलीस आणि परिवहन अधिकारी यांनी संयुक्तपणे धडक कारवाई करावी असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैध दारू विक्री होत असल्याबाबतही कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. वर्धा जिल्ह्याला लागून असलेले नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत माहिती देताना पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, मुत्थुट फायनान्स बँकेतून झालेल्या सोने चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी 6 तासात छडा लावला. सायबर टीमने अतिशय ऍक्टिव्हपणे काम केल्यामुळे चोरांना लवकर पकडणे शक्य झाले. भरोसा सेल अंतर्गत 2020 मध्ये पती – पत्नी वादाच्या 755 केसेस दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ 14 प्रकरणात गुन्हे दाखल झालेत, उर्वरित 741 प्रकरण समुपदेशन करून मिटविण्यात आली अशी माहिती श्री होळकर यांनी दिली. हिंगणघाटची तालुक्याची लोकसंख्या सुमारे अडीच लाख आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुक्यात नवीन ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती करणे अतिशय आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. यासाठीचा प्रस्ताव पाठवला असून त्याला मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस वाहनांसाठी पोलीस पेट्रोल पंप सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. शिवाय जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधिक्षकांसहित 126 पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि केलेल्या उपायोजनांबाबत माहिती दिली. जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर 2.16 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.5 टक्के आहे. तसेच मृत्युदर 2.74 टक्के आहे. पॉझिटिव्हीटी दर हा 4.87 टक्के असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय कमी असल्याचे श्री भीमनवार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 16 हजार 511 कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू झाले असून तीन दिवसात 1800 पैकी 1273 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिरोध करण्यासाठीची प्रतिपिंडे जनतेमध्ये कमी लोकसंख्येत तयार झाली आहेत अशा जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असून हा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा अशी स्थळे असतात की, जिथे अपघात होण्याची शक्यता दाट असते, मात्र अपघात स्थळे ठरविण्याच्या व्याख्येत अशी स्थळे बसत नाहीत. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अपघात स्थळे ठरविण्याची (ब्लॅक स्पॉट) ही व्याख्या बदलण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, महामार्ग पोलीस उपअधीक्षक श्री पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा पियुष जगताप, पुलगाव तृप्ती जाधव, हिंगणघाट भीमराव टेळे, सहाय्यक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले उपस्थित होते.