तक्रारकर्ते प्रशांत दोंतुलवार यांचा आरोप…!
यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील ताडसावळी ग्राम पंचायत अंतर्गत मधील सन २०१७ ते २०२० मधील माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता यात लाखोंचा भ्रष्टाचार आढळला असल्याचे आरोप करीत येथिल प्रशांत ईस्तारी दोंतुलवार यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करीत दोषींवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सादर केले आहे.
ताडसावळी ग्राम पंचायत ला पेसा फंडा अंतर्गत १३ लक्ष रूपये फंड मिळाला. तो खर्चही दाखविण्यात आला. मात्र वास्तवात २.५ लक्ष रुपयाचे एल. ई. डी. बल्ब लावण्यात आले परंतु या फंडातून कसल्याही प्रकारचे बल्ब न लावता १.४७ लक्ष रूपये व ९८ हजार रुपयांचे बिल लावण्यात आल्याचा आरोप आहे. व ते शासकिय सीएसआर रेट पेक्षा जास्त आहे. व याची कोणत्याही प्रकारे एम. बी. व टी. एस. न करता कोटेशन पध्दतीने खरेदी केलेली दाखवून कंपनीचे बिल लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. शासकिय नियमानुसार कोटेशन पध्दतीने खरेदी करण्यापूर्वी सदरची जाहिरात प्रसिद्धीस देणे व कंपनीचे कोटेशन बोलावीने बंधनकारक असते मात्र त्यांनी सर्व नियम वेशीला टांगून मनमानी पद्धतीने नियमबाह्य निधी खर्च केला.
यातील ८ लक्ष रूपये आदिवासी वस्तीत खर्च न करता अथवा कोणतेही साहित्य खरेदी न करता पैस्याची उचल करून हडप केल्याचा आरोप आपल्या तक्रारीतून केला आहे. याशिवाय १४ वा वित्त आयोगांतर्गत २५ लक्ष रुपये जमा झालेले होते तेही नियमाला डावलून खर्च करण्यात आले असून यात माहितीच्या अधिकारात अर्धवट माहिती देवून लपवा छपवी चालू आहे. यात हायमॅक्स लाईटपोल खरेदी करण्यास परवानगी नसतानाही ते लावण्यात आले. कुठलेही शासकिय नियम न बाळगता कोटेशन पद्धतीचा वापर करून कारोबार चालविला आहे. लॉक डाऊन काळात कोणत्याही ग्रामसभा वा मासिक सभा घेण्याची परवानगी नसतानाही चोरट्या मार्गाचा वापर करून कारोबार चालविला आहे. यामध्ये सामान्य निधी अंतर्गत सुध्दा मोठा भ्रष्टाचार आहे. या ग्राम पंचायती मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी सह उचित कारवाई करण्यासंबंधी ची लेखी तक्रार अमरावती आयुक्तांसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे तक्रारदार दोंतुलवार यांनी केली आहे.