अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी / यवतमाळ – यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार तथा घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहीत बी. देव यांनी पंचवीस हजार रुपयाच्या (पी. आर. बाँन्ड) जात मुचलक्यावर सोमवारी मंजूर केला. या प्रकरणात ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचेतर्फे अँड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.
◼️तथापि, ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांना 19 व 20 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 2 च्या दरम्यान अवधुतवाडी पोलीस स्टेशनला हजर होण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून, तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे. सोबतच साक्षीदारांवर दबाब आणू नये, न्यायालयाच्या परवानगी शिवाय देश सोडून जाऊ नये, अशी अट उच्च न्यायालयाने घातली आहे. दरम्यान, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनातर्फे यवतमाळच्या अवधुतवाडी पोलीस स्टेशनला नोटीस बजावली, असून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचेतर्फे उच्च न्यायालयात अँड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.
◼️ यवतमाळ येथील दांडेकर ले – आउट मधील सासरच्या घरी तलाठी विजय गोविंद गाढवे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगोदर आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु; मृतकाची आई भिमाबाई गोविंदराव गाढवे हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुलगा विजय गोविंद गाढवे याचा खुन झाल्याची फौजदारी याचीका 2019 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद होउन, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने ठाणेदारांसह ईतर आरोपी विरूध्द गुन्हे नोंदविण्याचे आदेश यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांना दिले होते.
◼️त्यावरुन सदर प्रकरणात भादंवि ३०२, ३०६, १६६, १६६ (अ) व १६७, ३४ अन्वये अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंदराव मुकूंदराव वागतकर, घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र रघुवरदयाल शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावडे, पोलीस हवालदार सतिष चौधरी व सासरची मंडळीसह आठ आरोपी विरूध्द अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
◼️या प्रकरणात अटक टाळण्यासाठी घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, अवधुतवाडीचे ठाणेदार आनंदराव वागतकर यांनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला.
◼️तदनंतर घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीनासाठी १२ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केला. सदर अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यात घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहीत बी. देव यांनी मंजूर केला आहे. सदर प्रकरणात संशयीत आरोपी ठाणेदार दिनेशचंद्र शुक्लातर्फे अँड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एस. ए. आशीरगडे यांनी बाजू मांडली.