मराठी भाषेच्या समृद्धतेचा अतुलनीय वारसा जपण्याचे केले आवाहन
ऑनलाईन परीसंवाद: “न्यायव्यवहारात मराठी भाषेचा वापर”
यवतमाळ – “जगभरात बोलल्या जाणा-या एकूण भाषांपैकी आपली मराठी भाषा हि सर्वात समृद्ध म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा गोडवा व अलंकाराचा अतुलनीय वारसा आपल्याला मिळाला आहे. न्यायालयात कामकाजात परदेशी भाषेच्या सातत्यपूर्ण वापरामुळे पक्षकारांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते, अशा प्रसंगी विधी अभ्यासक या नात्याने पक्षकारांशी व न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर केल्यास पक्षकारांना दिलासा देता येऊ शकतो”, असे प्रतिपादन न्या. आनंद बोरकर यांनी केले.
नुकतेच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने स्थानिक अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या मराठी भाषा मंडळातर्फे “न्यायव्यवहारात मराठी भाषेचा वापर” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन परीसंवादात प्रमुख वक्ते न्या आनंद बोरकर, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), तुमसर यांनी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुप्रभा यादगिरवार होत्या. कार्यक्रमाचे शेवटी प्राचार्या डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या दैदीप्यमान व गौरवाशाली इतिहासाशी अवगत करुन न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर वाढविण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी भाषा मंडळाच्या प्रभारी प्रा. छाया पोटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वैशाली फाळे यांनी केले. परीसंवादाचे यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. संदीप नगराळे, प्रा. डॉ. विजेश मुनोत, प्रा. स्वप्नील सगणे आदींनी अथक परीश्रम घेतले. परीसंवादाला अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“समृद्धतेचा अतुलनीय वारसा जपा”
न्या. आनंद बोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदींच्या संत वाड:मयापासून ते नवकवी व लेखकांपर्यंतचा साहीत्यमयी प्रवास उलगडून सांगितला. त्यांनी आपल्या संपूर्ण मार्गदर्शनात विविध ओव्या, कवितांची पेरणी करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. सरतेशेवटी आपण जगातील सर्वात समृद्ध भाषेचे पाईक आहोत, त्यामुळे आपल्यालाच मराठी भाषेचा समृद्धतेचा अतुलनीय वारसा जपण्याचे भावनिक आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.