रुग्णालयात उपचार सुरू
अमीन शाह
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात शबाना आजमी यांना दुखापत झाली असून त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात शबाना आजमी सुरक्षीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही.
शबाना आजमी या आपल्या खासगी कारमधून मुंबई येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. सुट्टी साजरी करण्यासाठी त्या खंडाळा येथे निघाल्या होत्या. अपघातात त्यांच्या नाकाला आणि तोंडाला दुखापत झाल्याची माहिती आहे. खालापूर टोलनाक्याजवळ आल्यावर त्यांच्या कारने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिणीने दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, शबाना आजमी यांच्यासोबत कारचालक आणि आणखी एक व्यक्ती असे मिळून तीघेजन कारने प्रवास करत होते. आजमी यांच्या कारचा चालक ही जखमी झाला आहे.