ईचोरा येथील तत्कालीन सरपंच व सचिवा विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ईचोरा (ता. आर्णी) ग्रामपंचायत मध्ये ५० लाख ६२ हजार ७८५ रुपयाचा संगणमत करुन अपहार करण्यात आला असून, आर्णी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या रिपोर्ट वरुन, आर्णी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी जी. आर. इंगोले यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी तत्कालीन सरपंच संदीप राजाराम वंजारी (वय ४२), ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव विलास गोविंदराव सोनुले (वय ४९) विरुद्ध भादंवि ४०९, ३४ अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले हे पुढील तपास करीत आहे.
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०१७ ते १४ जानेवारी २०२० पर्यंत तत्कालीन सरपंच संदीप वंजारी व सचिव विलास सोनुले हे आर्णी तालुक्यातील ईचोरा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते. दरम्यान, ईचोरा ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या रक्कमेत गैरप्रकार झाल्याचे आर्णी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या लक्षात आले. त्यावरुन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोविंद इंगोले यांना ईचोरा ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन ३ मार्च २०२१ रोजी पंचायत विस्तार अधिकारी इंगोले ह्यांनी सखोल चौकशी केली असता, त्यात सामान्य निधी, पाणी पुरवठा निधी, दलीत वस्ती सुधार योजना, बळीराजा चेतना अभियान, चौदावा वित्त आयोग तसेच जमा, खर्च तपशिलावरुन प्रमाणके उपलब्ध नसल्यामुळे आणि प्राकलन, मुल्यांकन व ईतर १ ते ३३ नमुने उपलब्ध नसल्यामुळे ५० लाख ६२ हजार ७८५ रुपयाचा संशयीत अपहार केल्याचे प्राथमिक चौकशी अहवालावरुन निष्पन्न झाल्याने तत्कालीन सरपंच संदीप वंजारी व सचिव विलास सोनुले हे दोघेही प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याचे अहवालावरुन दिसुन येत असल्याने, जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडघे यांच्या निर्देशावरुन सदर प्रकरणात अपहाराचे गुन्हे पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले करीत आहे. यामुळे आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे आर्णी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे हे मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांना गट विकास अधिकारी क्लास वन ची नौकरी लागल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याचे वृत आहे. तथापि, ईचोरा येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले असून जामीन अर्जावर 31 मार्च रोजी (बुधवारी) सुनावणी असल्याचे समजते.