Home उत्तर महाराष्ट्र मायबाप सरकारापेक्षा सावकार बरे……!

मायबाप सरकारापेक्षा सावकार बरे……!

1305

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे यांची खंत

एकाच गाण्यावर चार चार वेळेला वन्समोअर घेणारी आमची तमाशातली कलावंतीण आज घरोघरी जाऊन भांडी घासत आहे व आपला कुटुंबकबिला चालवत आहे.अशा एक नाही हजारो कलावंतीनीची आबाळ होत आहे, यांची पोरं ,संसार उघड्यावर आला आहे, आम्हाला नाही निदान अशा अनेक कलावतीना त्या जगू शकतील एव्हडे तरी पैसे मायबाप सरकारने द्यावे यासाठी आर्त टाहो फोडून न्याय मागत होत्या, जेष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे.आणि रघुवीर खेडकर.
एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या तमाशा कलावंतांच्या जीवनाची विदारक अवस्था त्या मांडत होत्या. तमाशाच्या मंचावर जी बाई नाचते ती कोणता शोक म्हणून नाचत नाही तर तर आपल्या पोरा-बाळासाठी ती नाचते, आपली घुंगर त्यांच्यासाठी वाजवते, एक -एक गाण्याला चार चारदा वन्समोअर घेणारी ही नृत्यांगना आज लोकांची धुनी भांडी करत आहे, आम्ही मायबाप सरकारला एवढीच विनंती करतो जी किमान हे कलावंत जगतील एवढे मानधन त्यांना द्या, पण तरीही आमचा आवाज कुणी ऐकत नाही. मी अनेक मंत्र्यांकडे गेले, पुढार्यांना आमची खंत सांगितली, तमाशात कांम करणाऱ्या कामगार- कलावंतांना दरमहा 5 हजार रुपये मानधन द्यावे, भले आमचे फड बंद असू द्या, ही सारी उपासमारीची रडकथा मंगलाताई मांडत होत्या. त्यांचा स्वर आर्त होत होता, आणि अनेकांच्या हृदयाला चिरत होता, वेदना देत होता.मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांच्या रुपात जणू महाराष्ट्रभरातील असंख्य कलावंत बोलत होते,मागच्या वर्षी लॉक डाऊन झाल्याने अनेक कलावंतांचे जगणे महाग झाले, हातावर पोट घेऊन गावोवाव भटकंती करणारे एकूणच सारे कलावंत मग ते तमाशात काम करणारे असोत, लोकशाहीर असोत, बँडवाले असोत, गोंधळी असोत आणखी कुणी, या सर्वांची कोरोनाच्या काळात फरपट झाली, त्यांचे संसार उघड्यावर आले.या एकूणच कामगार कलावंतांचे प्रश्न प्रातिनिधिक रूपाने हे उभय कलावंत मांडत होते. आज आपण केवळ तमाशा या लोकनाट्य कलेचा जरी विचार केला तर त्यात काम करणारा जो वर्ग आहे तो बहुजन आहे, त्याचा लढा केवळ आणि केवळ भाकरीसाठी आहे, आणि तीच जर हिरावली गेली तर काय करावे? हे कलावंत म्हणजे वातानुकूलित थिएटर मध्ये काम करणारे नाहीत, त्यांचा प्रेक्षक हा ग्रामीण आहे. त्यांची कला उघड्यावर सादर होणारी आहे. म्हणून तो आजही तितकाच उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. रघुवीर बोलत होते त्यांना सरकारने नाही तर सावकाराने वाचवले, त्यांचा तमाशा फड चालविण्यासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागले .सरकारने तर आश्वासनापलीकडे काही दिले नाही.आज महाराष्ट्रभरात 22 तमाशा फड होते पण त्यातील केवळ 11 फड सुरू आहेत.बाकी काळाच्या ओघात पार बुडून गेले.ही शोकांतिका त्यांनी बोलून दाखवली. एका तमाशाचा शो करायचा तर त्याला साठ हजार रुपये लागतात. त्यासाठी पब्लिक येणं गरजेचं आहे आणि जर एव्हढा खर्च करून देखील कधी पब्लिक आलं नाही तर तो खर्च निघत नाही. बँक स्टेज, कलावंत व इतर कलावंत असा मोठा कुटुंब कबिला सोबत घेऊन फिरायचे तेव्हा खर्चाचे ताळेबंद करावे लागते आणि त्यातही पूर्ण वर्षभर जर कार्यक्रम बंद राहिले, तर खायचे काय? असा मूलभूत प्रश्न ते विचारत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दात विनवणीचा सूर होता, कुठेही कोणतीही घमेंडी अस्मिता त्यांच्या बोलण्यातून जाणवत नव्हती.आमची तमाशात नाचणारी कलावंतीण ही झाशीची राणी आहे, असे रघुवीर म्हणत होते.
होय…रघुवीर खेडकर तुमचं बरोबर आहे, तुम्ही कलेचे दोन वर्ग नकळतपणे मांडले. आज जी लोककला आहे, तिचे स्वरूप डिजिटल झाले आहे. तिचा लोककलेचा बाज अधिक बाजारू करण्यात एक वर्ग कार्यरत आहे. मात्र तो दिसत नाही. तुम्ही तर पारंपरिक कला जतन करत आहात, लोक कलेचे गोडवे गाणारे तथाकथित तर पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून वातानुकूलित थिएटरमध्ये बसलेत, त्यांचे लक्ष तुमच्याकडे कसे वळणार? तुम्ही ज्या गावात जातात, त्या गावचे रीतिरिवाज तुम्हाला अगोदर समजाऊन घ्यावे लागतात.जर थोडेंजरी तुम्ही गावात वागताना चुकले तर तुम्हाला गावाच्या आणि संस्कृतीच्या ठेकेदारांकडून मार खावा लागतो, प्रसंगी तुमच्या कलावंतिनीकडे त्यांचा डोळा जातो, तिची बेअब्रू होण्यापासूनही तुम्हाला तिला वाचवावे लागते, एवढे सारे सोसूनही तुम्ही त्यांना रसिक मायबाप म्हणता ,खरंतर तुमचे हे मोठेपण एखाद्या संताजवळ पाहायला मिळते.अंगभर वस्त्रे परिधान करून रसिकांचे मन जिंकून घेणारी तमाशातली नृत्यांगना ही नाचीनच राहिली आणि कमीत कमी कपडे घालून हॉट सिन देणारी इथल्या आंबट शौकिनांनी रात्रीतून स्टार केली.दिवसा सभा- संमेलनातून मोठ्या बाता ठोकणाऱ्या गाव-गुंडांची पोरे थेट तुमच्या कलावंतीण पोरींना भिडतात, त्यांच्यावर नाचत असताना खडे , काटे, फेकतात, पण तुम्ही कमालीचे सहनशील! अहो, तरीही तुम्ही त्यांना रसिक मायबाप म्हणून पुढच्या मुक्कामी आपला कबिला घेऊन निघता.
सांगली-कोल्हापूरात आलेल्या महापुरात मंगला बनसोडे यांनी तर मदतीचा एक ट्रक पाठवला होता.केव्हढे विशाल मन! असो आज तुम्ही जरी एका तमाशा फडाचे मालक असला तरी अनेक तळागाळातील कलावंतांचे पोशिंदे आहात. तुम्ही स्वतःच या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढे आलात, विठाबाई नारायणगावकर महामंडळ तुम्ही स्थापन केलेत ही तर आनंदाची बाब! यातून नक्की कलावंतांचे पुनर्वसन होईल ही ठोस आशा बाळगू मात्र, वांझोट्या सरकारचे पाय धरू नका आणि नाही कोणत्या पुढाऱ्यांचे
तुमच्या कलेला त्रिवार सलाम !

प्रा.अमर ठोंबरे
, पत्रकार संरक्षण समिती  ( नाशिक जिल्हा समन्वयक )