Home मुंबई कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी जबाबदारी लक्षात घेऊन...

कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे – पालकमंत्री अमित देशमुख

473

मुंबई,दि.6 : कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपल्या जबाबदाऱ्या विभागून घेऊन अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत व्हावे कोणत्याही परिस्थितीत रूग्णसंख्या वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, मार्गदर्शक सूचनांची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन जिल्ह्यातील जनतेने याकामी सकारात्मक राहून स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना आखून त्यावरील अंमलबजावणीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लातूर जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ढगे, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ.उदय मोहिते, डॉ.हरीदास हे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून तर सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील कोविड-19 प्रादुर्भावाची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर श्री. देशमुख यांनी या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षीएवढी रूग्णसंख्या वाढू नये याची दक्षता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मिळून घ्यावयाची आहे असे निर्देश त्यांनी दिले.

शहरांमधून प्रादुर्भाव अधिक, यंत्रणांनी सजग रहावे

जिल्ह्यातील एकूण रूग्णवाढीचा आढावा घेतला असता ग्रामीण भागाच्या तुलनेत लातूर व जिल्ह्यातील इतर शहरात रूग्णसंख्या अधिक गतीने वाढताना दिसत आहे, त्यामुळे शहरातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगळे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीवर जास्तीचे लक्ष देण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. एकदा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील रूग्ण शोधण्यासाठी जलद मोहीम राबवावी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले.

मृत्यूदर कमी राहील याची काळजी घ्यावी

वेळेत चांगले उपचार मिळाल्यानंतर रूग्णांचा मृत्यूदर कमी राहतो हा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी जास्तीत जास्त टेस्ट करून रूग्ण लवकरात लवकर उपचारासाठी येईल याचे नियोजन करावे त्यासाठी महसूल व इतर यंत्रणा त्यांना सहकार्य करतील असे त्यांनी म्हटले.

पोलीस यंत्रणांनी सक्ती करू नये

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निर्बंध जाहीर केले आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेनी करावी. हे करीत असताना कोठेही सक्तीची वापर न करता समजावून सांगणे, प्रसंगी चर्चा करावी असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

तपासणीत वाढ करण्याचे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणीची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सर्व तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांना सांगितले तपासणी वाढविण्यासाठी फार्मासिस्ट, आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी संस्था यांची मदत घेणे शक्य आहे का हेही जिल्हाधिकारी यांनी तपासून पाहावे असे त्यांनी सांगितले.

खासगी लॅबमधून होणाऱ्या तपासण्यांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद होते किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या. एकूण तपासणी किटची नोंद व्हावी जेणेकरून रूग्णांची नेमकी संख्या लक्षात येईल. शिवाय त्या रूग्णावरील उपचार आणि त्यांच्या संपर्कातील उपचार याची माहिती मिळू शकेल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

 

वर्क फ्रॉर्म होमवर भर द्यावा

शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी या काळात ‘वर्क फॉर्म होम’बाबत जागृती करून त्याची अंमलबजावणी होईल यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी. शाळा, कॉलेज, शिकवणी, होस्टेल यावर लक्ष ठेवावे असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

अतिदक्षता बेडची संख्या वाढवावी

लातूर जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील एकूण बेडची संख्या त्यापैकी अतिदक्षता विभागातील बेडची संख्या याची माहिती घेतल्यानंतर अतिदक्षता बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेला दिले आहेत. लातूर येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या कोविड डेडिकेटेड रूग्णालयात आणखी वॉर्ड सुरू करावेत तसेच वैद्यकीय महाविद्यालयाने अतिदक्षता विभागाचा विस्तार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. या ठिकाणी किंवा जवळपास कोविड केअर सेंटर सुरू करता येते का ते पाहावे, वैद्यकीय महाविद्ययालयातील सर्व यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. एक्सरे, व्हेंटिलेटर यासारख्या यंत्रणा नादुरूस्त राहणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले.

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न सर्व संस्थाचा सहभाग घ्यावा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित असलेली वैद्यकीय महाविद्ययालये, आर्युवेदिक, होमिओपॅथिक, नर्सिंग, औषधशास्त्र महाविद्यालये यांचे सहकार्य घ्यावे, गरज पडल्यास या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

रेमडेसिवीरची कमतरता भासणार नाही;

अधिकचे दर घेणाऱ्यावर कडक कारवाई

कोविड रूग्णांच्या उपचाराच्या बाबतीत शासकीय तसेच खाजगी रूग्णालयांनी दक्ष रहावे औषधे, एक्सरे व इतर तपासण्या यांचे दर निश्चित केलेले आहेत त्यापेक्षा अधिकचे दर कोणीही घेणार नाही यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे असे सांगून रेमडेसिवीर इंजेक्शनची यापूढे कमतरता भासणार नाही असेही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा लातूर जिल्ह्यासाठी उपलब्ध व्हावा या दृष्टीने संबंधित कंपनी व प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. याउपरही अडचणी येत असतील तर जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी संपर्क साधावा असे पालकमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.