रविंद्र साखरे आर्वी
वर्धा – महाराष्ट्र शासना ने काढलेल्या ‘ब्रेक द चेन’ आदेशातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा व्यापारी संघाने निषेध नोंदवला असून, या आदेशात शिथिलता द्या अन्यथा जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद करू, असा इशारा व्यापारी संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
राज्य सरकारने नवे आदेश निर्गत करून दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. मात्र, तब्बल १३ महिन्यांपासून लहान व्यावसायिकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. या आदेशामुळे कापड विक्री, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, ऑटो पार्टस् विक्रेते, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते, सराफा व्यावसायिक, मांस विक्रेते. नाभिक व्यावसायिक व इतर लहान दुकानदारांवर मोठे आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे या सर्वव्यावसायिकांच्या मानसिक स्थितीवर आघात होऊन त्यांच्यावर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या या आदेशाचा तीव्र निषेध नोंदवून या आदेशावर पुनर्विचार करून दुकाने बंदचे आदेश शिथील करावेत, अशी मागणी या निवेदनातून व्यापारी संघटनेने केली आहे.
शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवू, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांनी बुधवारी माजी आमदार अमर काळे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. हे निवेदन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान, सचिव सुरेश कोटवाणी, अनिल लालवाणी,संदीप केला, विजय अग्रवाल, दीपक मोटवानी आदींसह व्यावसायिकांनी दिले.