१३२ लोकांची मोफत RTPCR चाचणी व मोफत औषधी वाटप
यवतमाळ / पुसद
कोरोनाची दुसरी लाट, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात, जास्त आक्रमकतेने पसरत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक आढळून येत आहे. मागच्या वर्षी मुंगशी या गावात एकही रुग्ण आढळला नव्हता.
यावर्षी मात्र मागील महिन्यातच ६-७ व्यक्ती कोरोना बाधित झालेत. कोरोना बद्दल ठोस माहिती उपलब्ध नसली तरी कोरोनाची बाधा होऊ न देणे किंवा झालीच तर लवकराच स्वतःचे विलीगिकरण करून उपचार घेणे ह्या बाबी सर्वमान्य आहेत. उपचारात एक-दोन दिवसाची दिरंगाई झाली तर महत्वाच्या अवयवांना गंभीर संसर्ग होऊन थेट रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. सद्यस्थितीत शासकीयच काय तर खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोरोना बेड उपलब्ध होणे कठीण झालेय. त्यावर ऑक्सिजन, रेमडेसिवीर, ई. चा सुद्धा तुटवडा निर्माण झालाय. कसेतरी बेड उपलब्ध झालेच तरी गरीब ग्रामीण रुग्णांना खाजगी रुग्णालयातील महागडे कोरोना उपचार परवडण्यासारखे नाही.
कोरोनाबाबत या सर्व बाजूंची चर्चा मुंगशीचे गावकरी, मुंगशी ग्रामपंचायतचे नवनियुक्त सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी केली. खबरदारी, लवकर निदान, प्रतिबंधात्मक औषधी आणि विलीगिकरण या मुख्य मुद्द्यांना अनुसरून गाव पातळीवरच उपाययोजना करण्यावर एकमत झाले. शासकीय मदत व परवानगीसाठी अधिकारी स्तरावर प्रयत्न करण्यात मौल्यवान वेळ गेला पण काहीच फायदा झाला नाही. मग गावकऱ्यांनीच एकमताने व स्वयंस्फूर्तीने कोरोनाशी दोन-दोन हात करायचे ठरविले.
ग्राम पंचायत सदस्यांनी चोंढी येथील स्थानिक आरोग्य यंत्रणेला संपर्क केला व गावात RTPCR चाचणी कॅम्प घेण्याची विनंती केली. दोन दिवसांपासून गावात जनजागृती करून ज्यांना थोडेफारही लक्षणे वाटत आहेत असे व्यक्ती, त्यांच्या परिवारातील सदस्य व शेजारी, इ. चे RTPCR कोरोना चाचणी करून घेण्यास प्रवृत्त केले.
त्या अनुषंगाने आज शासकीय रुग्णालय चोंढी येथील डॉ. विशाल चव्हाण व त्यांची टीम गावात आली व गावकऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद देऊन _*पहिल्याच दिवशी १३२ लोकांनी कोरोना चाचणी करून घेतली. चाचणी साहित्य संपल्यामुळे ही प्रक्रिया उद्याही सुरू ठेवण्यात येईल.*_ रिपोर्ट किंवा शासकीय मदतीची वाट न पाहता गाव पातळीवरच प्राथमिक औषधींची अद्यावत किट तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने गावातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्यात जेणेकरून कोरोना असला तरी प्राथमिक स्टेजलाच आवाक्यात येण्यास मदत होईल. तसेच जर एखाद्या व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले व शासनाकडून गृहविलीगिकरण करण्याचा सल्ला मिळाला अश्या व्यक्तींना दाट वस्तीत न ठेवता त्यांच्या राहण्यासाठी गावाबाहेरील सार्वजनिक ठिकाण स्वच्छ व सॅनिटाईझ करून तिथे विलीगिकरणाची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले आहे.या सर्व उपक्रमात गावातील सरपंच श्री अमेय चव्हाण, पोलीस पाटील श्री उमेश पवार, ग्रामपंचायतचे युवा सदस्य श्री दिनेश पवार, श्री पृथ्वीराज ना. चव्हाण, श्री मिथुन चव्हाण, ग्रामपंचायत सहकारी श्री अविनाश चव्हाण, श्री कैलास गरडे, गावातील नागरिक श्री अजय चव्हाण, श्री बाळू पवार, श्री विजय राठोड, श्री निलेश पवार, व इतर गावकऱ्यांनी मेहनत घेतली.
अशी माहिती यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ संचालक अनुकूल चव्हाण यांनी दिली
Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पासून जवळच असलेले मुंगशी येथे कोरोना विरुद्ध प्रतिबंधात्मक नियोजन