रेल्वेच्या धडकेने माय अन दोन चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू
अमीन शाह
पालघर , दि. १९ :- बोईसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना मायलेकरांना मालगाडीची जोरात धडक बसली. या अपघातात आईसह 4 वर्षांची मुलगी आणि 8 महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आज सकाळी 11 च्या सुमारासही ह्रदयद्रावक घटना घडली. बोईसर यार्डाजवळ असलेल्या खैराफाटक पुलाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीने तिघांना उडवलं. यामध्ये मातेसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मातेसह आठ महिन्यांचे बाळ आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही. या पुलानजीक अपघात घडण्याची ही जवळपास सहावी घटना आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईसर यार्डाजवळ एक्स्प्रेस आली असता रेल्वे रूळ ओलांडत असताना महिला आणि तिच्यासह मुलांना धडक बसली. त्यानंतर मोटरमॅनने स्टेशन मास्तरला याबद्दल माहिती कळवली. स्टेशन मास्तरच्या माहितीनंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. परंतु, हा अपघात होता की आत्महत्या होती, हे अजून कळू शकले नाही. याबद्दल पोलीस तपास करत आहे.