Home विदर्भ मुकुटबनचे ठाणेदार सोनुने वर अभिनंदनाचा वर्षाव पोलीस अधीक्षकांनी केले 50 हजार रुपयाचे...

मुकुटबनचे ठाणेदार सोनुने वर अभिनंदनाचा वर्षाव पोलीस अधीक्षकांनी केले 50 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर मुकूटबन पोलिसांनी 48 तासाच्या आत आरोपीस केले जेरबंद

1466

रफीक कनोजे

झरी जामणी (जी. यवतमाळ) : पांढरकवडा वन विभाग अंतर्गत झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन वन परिक्षेत्रातील मांगूर्ला नियत क्षेत्र व कक्ष क्रमांक 30 मध्ये वाघिण मृत झाल्याची घटना ता. 25 ला घडली.

त्यामुळे या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती, परंतू या प्रकरणी तीन दिवस झाले तरी आरोपी हुडकून काढण्यास वनविभागाला अपयश आल्याने या करिता पोलिस विभागाला पत्र पाठवून मदत घेण्यात आली. त्यावरून मांगूर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र. 30 मध्ये ता. 28 ला पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, वन अधिकारी, एलासिबी पथक, मुकूटबन पोलीस, पाटण पोलीस अधिकारी यांनी वाघिणीच्या गुहेची पाहणी केली. त्यानंतर मुकूटबन पोलीस ठाणेदार धर्मा सोनुने यांना मार्गदर्शन करून वाघिणीच्या आरोपींना पकडण्याचे आदेश देऊन दुपारी बारा वाजता यवतमाळला रवाना झाले.

पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांचे आदेशावरून मुकूटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मा सोनुने यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय ऋषी ठाकूर, मांगूर्ला क्षेत्रातील बीट जमादार दिलीप जाधव यांनी 24 तासाच्या आत वेगवेगळ्या पध्दतीने गोपनीय माहिती काढली व वाघिणीचे शिकारी पांढरवाणी येथील मुख्य सूत्रधार लेतू रामा आत्राम व अशोक लेतू आत्राम व ईतर आहे असे समजले. परंतु पांढरवाणी गावात त्यांना कायदा व सुव्यवस्था राखून आरोपींना अटक करणे मुकूटबन पोलिसांसमोर आव्हान होतेे. त्यामुळे ठाणेदार सोनुने यांनी ही माहिती ता. 29 ला रात्री पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांना दिली. त्यावरून पांढरवाणी येथे ता. 30 ला मुकूटबन पोलीस, पांढरकवडा वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी, एलसीबी पथक यवतमाळ, पाटण, शिरपूर, वणी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात मुकूटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मा सोनुने यांच्यासह 200 ते 250 वन व पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पांढरवाणी गावाला वेढा घालून पांढरवाणी येथील लेतू रामा आत्राम वय 45 वर्ष व अशोक लेतू आत्राम वय 25 वर्ष या दोन बाप लेकाना त्यांचे राहते गावातील घरून पांढरवाणी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना घेऊन हा लवाजमा पांढरकवडा येथे गेला.

त्यानंतर पांढरकवडा येथे शुक्रवारी (ता. 30) रात्री 9 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पालकमंत्री संदीपन भुमरे, खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वनसंरक्षक रामाराव, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, पांढरकवडा वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी, एल सी बी पथक यवतमाळ, पाटण, शिरपूर, वणी येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी मुकूटबन पोलिसांनी 48 तासाच्या आत आरोपीस जेरबंद केले त्यामुळे ठाणेदार धर्मा सोनुने, एएसआय ऋषी ठाकुर, जमादार दिलीप जाधव या तिघांचे अभिनंदन करून 50 हजार रुपयाचे बक्षीस देण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. तेव्हापासून मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.