लियाकत शाह
जळगाव , दि. २० :- शिक्षक, मुख्याध्यापक हे अनेक अशैक्षणिक कामांत गुंतल्याने त्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र त्यांच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते. त्यामुळे शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची अतिरिक्त कामे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी केली. बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षीय दिन सन्मान सोहळ्यात गायकवाड बोलत होत्या. गायकवाड म्हणाल्या, ‘मी शालेय शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारून १५ दिवसच झाले आहे. मात्र, शाळा-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मला माहिती आहेत. आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो व त्यांना २५० अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून ते जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश आहे. अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी कामे बंद करण्यात येतील. त्याचप्रमाणे विनाअनुदानित शाळांबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू असून तो प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. मी स्वत: शिक्षिका असल्याने मला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. शिक्षकांनी आपले प्रश्न इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चर्चेने सोडवावेत.