घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
एखाद्या गरजवंताला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंदलहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फिल्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच. म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांनी व्यक्त केले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील काही सेवाभावी, आध्यात्मिक संस्था, निराधार, गोरगरिबांना तसेच नि:स्वार्थपणे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या काही घटकांना रामेश्वर लोया यांनी अन्नधान्य, किराणा किटचे वाटप केले.कोरोणाच्या पार्श्वभुमीवर आज समाजातील आर्थिक नियोजन बिघडले आहे, मध्यमवर्गीय कुटुंबात उपासमार होत आहे,त्या अनुषंगाने लोया यांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.प्रसंग कुठलाही असो शांतीच्या मार्गाने सामोरे गेले पाहिजे. पुढे ते म्हणाले,
फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना, स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.