Home नांदेड जीवन घडवणारी पुस्तके वाचून आपल्या जीवनाला आकार द्यावा‌- उप विभागीय पोलिस अधिकारी...

जीवन घडवणारी पुस्तके वाचून आपल्या जीवनाला आकार द्यावा‌- उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक

190

मजहर शेख

नांदेड/किनवट,दि : १९:- कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान नवीनवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाला पर्याय नाही. जीवन घडवणारी पुस्तके वाचून आपण आपल्या जीवनाला आकार देउ शकतो. असे प्रतिपादन उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी केले.

पैनगंगा अभयारण्याच्या विदर्भ सिमेवर पैनगंगा नदीतिरावर असलेल्या तालुक्यातील अतिदुर्गम लक्कडकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “गोष्टीची पुस्तके शालेय साहित्य वाटप व कोरोना जनजागृती कार्यक्रमाचा” अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
यावेळी सौ.स्वाती नाईक, सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार भोळ, केंद्र प्रमुख विजय मडावी, प्रतिष्ठित नागरीक बळीराम कदम, जालींदर मुखाडे, बालाजी कदम, कु. वरदा नाईक व कु. स्वरदा नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या शाळा बंद असल्यातरी मुलांना संस्कारक्षम गोष्टी वाचता याव्यात यासाठी गोष्टींची पुस्तके व सृजनशीलतेला वाव देण्यासाठी चित्र रेखाटन वही, रंग साहित्य आदी शालेय साहित्य व मास्क वाटपासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन व गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रा. डाॅ. सुनिल व्यवहारे यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तंत्रस्नेही शिक्षक कलावंत रुपेश मुनेश्वर यांनी कोरोना जनजागृती गीत सादर केले व आभार मानले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार भोळ, केंद्र प्रमुख विजय मडावी व एएनएम श्रीमती शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनात घ्यावयाच्या दक्षतेबद्दल सर्वांना अवगत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष दासरवार, जमादार पांडुरंग बोण्डलेवाड, पोलिस कर्मचारी संदीप वानखेडे, गजानन चव्हाण, भीमराव नरवाडे यांनी परिश्रम घेतले.