कर्जत – |जयेश जाधव
फर्निचरच्या कामाचे रंग काम करण्यास आणलेले रंगाचे डब्बे व इतर सामान घेऊन पळून जाणाऱ्या एकास कर्जत पोलिसांनी मुंबई येथे ताब्यात घेतले आहे.
कर्जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तमनाथ येथील संदीप अनंत भोईर यांच्या बंगल्यांमध्ये फर्निचर चे काम चालू होते, सदर चे काम हे मुंबई बांद्रा येथील रणजीत बजरंगी गुप्ता हा करीत होता, त्याच फर्निचरचे काम करण्याकरिता रंगाचे डबे व इतर सामान दिले होते, गुप्ता याने रंगाचे काम न करता डबे व इतर सामान घेवून मुंबई येथे पळ काढला होता. रणजित गुप्ता रंगाचे काम करत नाही म्हणून संदीप भोईर यांनी त्यास फोन लावला मात्र त्याचा फोन बंद लागत होता. संदीप भोईर यांची खात्री झाली हा इसम 54 हजार 528 रुपये किंमतीचे रंगाचे डब्बे व सामान घेवून पळाला आहे.
याबाबत संदीप भोईर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं.145/2021 भा.द.वि.क. 381 अन्वये गुन्हा दाखल केला.कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार अश्रूबा बेंद्रे हे तपास करीत असताना सदर रणजित गुप्ता याला मुंबई वडाळा येथून मुद्देमाला सह अवघ्या 5 तासात मुसक्या आवळण्यात यश आले आहे.कर्जत पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याबदल आभार मानले.