5 जी विरोधात दाखल केली होती याचिका ,
अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली 5G सेवेला विरोध दर्शवणारी याचिका न्यायालयानं आता रद्द केली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांना २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याचबरोबर जुहीने ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली असल्याचंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
5G नेटवर्कच्या तरंगांमुळे पर्यावरण आणि मानवी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करावा, त्यासंदर्भात संशोधन करण्यात यावं अशी जुहीची याचिका होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितलं की ही याचिका केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने सांगितलं की या याचिकेला कोणताही आधार नाही, ही याचिका विनाकारण दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने सांगितलं की तिने सर्वप्रथम सरकारकडे याबद्दल आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. त्याचप्रमाणे जुहीने या याचिकेच्या सुनावणीची लिंक सोशल मीडियावर व्हायरल केली असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.