कर्जत| – जयेश जाधव
आज कर्जत तालुक्यात भिवपुरी परिसरात अनेक उदघाटन तसेच लोकोपयोगी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात आले,ते कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले काम नाही.मनसे पदाधिकारी व सैनिकांनी जनतेची कामे अहोरात्र करावी व त्यांच्या मनात जागा करावी,ही शिकवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांची असल्याचे मत मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू दादा पाटील यांनी व्यक्त केले.
कर्जत तालुक्यातील उमरोली येथील सर्वेश सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार राजू दादा पाटील यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.पाटील , सचिन कर्णुक , कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक हेमंत ठाणगे ,महेंद्र निगुडकर ,कर्जत शहराध्यक्ष समीर चव्हाण , माजी नगरसेवक धनंजय दुर्गे त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी महिलावर्ग आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी आमदार राजुदादा पाटील यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले.कर्जत तालुक्यातील भिवपुरी परिसरात मनसेच्या वतीने विविध लोकोपयोगी कामांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली उदघाटन सन्माननीय मनसे नेते तथा मा. आमदार राजुदादा पाटील – कल्याण ग्रामीण मतदार संघ यांच्या शुभहस्ते कर्जत तालुक्यातील भिवपुरी – उमरोली परिसरात रायगड जिल्हाध्यक्ष यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन तसेच कर्जत – कल्याण महामार्गावरील डिकसळ ते उमरोली येथे स्वयंचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहळा व कोरोना काळात , त्याचप्रमाणे नैसर्गिक वादळ व आपत्कालीन परिस्थितीत स्वताच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी समाजात घडणाऱ्या घटना जनतेसमोर आणणाऱ्या पत्रकारांचा यथोचित सत्कार व पावसाळी रेनकोटचे वाटप कार्यक्रम तसेच डिजी ब्रेकिंग न्यूज पक्षाचे पोर्टल चॅनलचे उदघाटन आमदार राजू दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार राजू दादा पाटील पुढे म्हणाले की , मनसे सैनिकांनी नागरिकांची मने जिंका असा राजसाहेब यांचा आदेश आहे,तो पाळा संधी मिळेल तिथे कार्य करा,असा संदेश त्यांनी मनसे सैनिकांना दिला.पत्रकारांना प्रशासनाने योग्य दर्जा दिला नाही,याची खंत त्यांनी व्यक्त केली.तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील म्हणाले की,घासल्या शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,मनसे शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला,म्हणूनच समाजकार्याचा धडाका पक्षाध्यक्ष राजसाहेब यांच्या आदेशाने सुरू आहे.अहोरात्र कृष्णकुंज उघडे असून,सर्वत्र कार्य चालू आहे,कोरोना काळात फायनान्स कंपनी विरोधात केलेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी फायनान्स कंपनीला तंबी देवून पैसे वसुली करण्यास बंदी केली हे सांगून पोलीस ,वीज कर्मचारी , पत्रकार यांना पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून रेनकोट वाटप केले आहे.जनसंपर्क कार्यालयात नेहमीच गोर गरिबांसाठी कामे होणार , असे दमदार अभिवचन जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी समस्त उपस्थितांना दिले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.पाटील व सचिन कर्णुक यांनी देखील आपले मत व्यक्त केले.यावेळी सर्वेश हॉल – उमरोली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी , मनसैनिक , व महिला कार्यकर्त्यांनी भरला होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील परदेशी यांनी केले..