मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट ,दि : २६:- कोरोनाविषाणू च्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील देवस्थान पर्यटन स्थळे व आस्थापने यांना विविध वेळामध्ये बंद करण्याचे आदेश अद्यापही लागू असताना किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथे पर्यटकांची होणारी गर्दी ही चिंतेची बाब ठरत असतांना, नांदेड जिल्हा प्रशासनाने याकडे केलेले दुर्लक्ष हे देखील गंभीर ठरणार आहे.
सहस्रकुंड येथे यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भाच्या बाजूने पर्यटकांना गोळा होण्यास मज्जाव करणारे आदेश यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी नुकतेच काढले आहे. परंतु मराठवाड्याच्या बाजूने नांदेड जिल्ह्यात असलेल्या सहस्रकुंड येथील बाजूला रोज हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. यामुळे राज्यात लागू असलेल्या विविध रोग प्रतिबंध कायदे व शासनादेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्य शासनाने अद्याप देवस्थान उघडण्याचे आदेश दिले नसतांना किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील गर्दी ही चिंतेचा विषय आहे. राज्यातील इतर नामवंत पर्यटक स्थळावर जाण्यापासून शासनाने नागरिकांना मज्जाव घातला असतांना सहस्रकुंड येथे सूट कशामुळे देण्यात आली हा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सह सर्वच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून येथे पर्यटनाचा आनंद घेतला त्यावेळी कोरोना चे जे नियम सर्वसामान्य नागरिकांना लागू होतात ते या अधिकाऱ्यांना लागू होत नाही का असा प्रश्न ही उपस्थित होतो