प्रतिनिधी – मजहर शेख, नांदेड
नांदेड,दि . 29 – 15 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीनंतर 12 हजार रुपये लाच मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि.7 जुलै रोजी नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आणि शेती उपयोगी खते, बियाणे, औषधी विक्री करण्यासाठी लागणारा परवाना तालुका कृषी अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव कृषी अधिक्षक कार्यालय नांदेड यांच्याकडे पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी रमेश लक्ष्मण पसलवाड यांनी 9 हजार रुपये लाचेची मागणी केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 16 जुलै रोजी पडताळणी केली. या पडताळणीच्या वेळेस तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी 9 हजारांची लाच मागणी 15 हजार केली. कारण तक्रारदाराने पैसे देण्यास उशीर केला होता. त्यावेळी झालेल्या तडजोडीत 15 हजारांची लाच 12 हजार रुपये घेणार असे रमेश पसलवाड यांनी मान्य केले. लाच मागणी करून ती लाच मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रमेश लक्ष्मण पसलवाड (57) व्यवसाय तालुका कृषी अधिकारी बिलोली रा.राजगड नगर, छत्रपती चौक नांदेड यांच्याविरुध्द आज आता बिलोली पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रमेश पसलवाडला ताब्यात पण घेतले आहे.
ही कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अंतवार, ईश्र्वर जाधव, नरेंद्र बोडके यांनी पुर्ण केली आहे.