पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
पोलिसांना गुन्हेंगारांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशा दाखवण्याचे काम औरंगाबाद येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. परंतू नागरिकांना या विषयीची माहिती देण्यासाठी दरवर्षी गृह विभागाकडून जन जागृती सप्ताह आयोजित केला जातो. असाच सप्ताह औरंगाबाद येथील छावणी निजाम बंगला येथे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ‘‘न्यायसहायक विज्ञान जागृती कार्यक्रम 2020’’ नुकताच पार पडला.
शहरातील ही प्रयोगशाळा महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येते. येथे रासायनिक विश्लेषणाचे काम चालते. या प्रयोगशाळेत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हयांमधील पुराव्यासाठी उपयुक्त असलेल्या नमुन्याचे रासायनिक विश्लेषण केले जाते व त्यासंबंधीचा विश्लेषण अहवाल पाठविला जातो, असे प्रयोगशाळेचे उपसंचालक रा. रा. मावळे यांनी सांगितले.
समाजात घडणा-या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्याचे शास्त्रीय पध्दतीने विश्लेषणाचे कार्य न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये केले जाते. अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारांकडून गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्री व पध्दतींचा वापर होत आहे. अशा प्रवृत्तींना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालांवर रासायनिक विश्लेषण करुन सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून तपास यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्याकामी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका आहे. या प्रयोगशाळेत गुन्ह्याच्या उकल करण्याच्या दृष्टीने गुन्ह्यांचे रासायनिक विश्लेषणाचे काम केले जाते, व याचा उपयोग पोलिस व न्यायालयाला गुन्हा सिध्दतेसाठी होऊन गुन्हेगाराला जबर शिक्षा केली जाते.
महाराष्ट्रात सात मोठ्या तर पाच लघु प्रयोगशाळा
महाराष्ट्रात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे आहेत. तर लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर येथे आहेत.
न्यायसहायक प्रयोग शाळेतील विभाग
न्यायसहायक विज्ञानशाखेच्या प्रयोगशाळेत विविध विभाग काम करतात. यात सामान्य विश्लेषण व उपकरणीय विभाग, जीवशास्त्र विभाग, डी.एन.ए, विषशास्त्र, दारुबंदी व उत्पादन शुल्क विभाग तसेच ध्वनी विश्लेषण व ध्वनी फित असे 6 विभाग सध्या कार्यरत आहेत तसेच न्यायसहायक विज्ञान शाखेच्या प्रयोगशाळेत मानसोपचार तज्ञ व रोग तज्ञ तर असतात याचबरोबर हस्ताक्षर तज्ञ, छायाचित्रकार व वर्णनावरुन चित्र रेखाटणारे चित्रकारही असतात.
पुरावा उचलताना घ्यावयाची काळजी
पोलिस गुन्हयाचा तपास करत असताना पुरावे हाताळत असताना योग्य साधन सामुग्रीचा वापर न केल्याने ते पुरावा नमुने नष्ट होण्याची शक्यता असते. परंतू गुन्हयाचा तपास करत असताना पुरावा उचलतांना योग्य ती काळजी घेतली तर गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर होण्यास मदत मिळते. तसेच प्रयोगशाळेत पुरावा उचलण्यासाठी काही विशिष्ट चिमटे, कागद आणि साधने व रसायनांचा वापर केला जातो.
या जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था संचालक डॉ. एस. जी. गुप्ता, पोलीस उपायुक्त मिना मकवाना, सहायक वनसंरक्षक अधिकारी दिपक शंकरवार, सहायक संचालक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे शंकर चेंदवणकर, मुख्य व्यवस्थापक डि.सी.बी बँक देवस्थळी, प्रयोगशाळेचे उपसंचालक रा. रा. मावळे, डी.एन.ए. विभागाचे सहायक संचालक, खे. दे. राणे, रुं. गो. खिल्लारे, यांच्यासह शहरातील रसायनशास्त्र, आयुर्वेदिक, होमियोपॅथी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस तपास अधिकारी व अभियोग न्यायालयासंबंधी असलेल्या अभियोक्ता यांची उपस्थिती होती.