जालना / अंबड – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा.लक्ष्मण हाके (राज्यमंत्री दर्जा) यांनी अंबड येथील होळकर रियासतीचे अभ्यासक श्री.रामभाऊ लांडे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देत मराठा कालखंडावर तसेच त्यांच्या संशोधनात्मक बाबींवर चर्चा करुन मराठ्यांचा अज्ञात इतिहास पुढे आणण्यासाठी सुरू असलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
श्री. हाके यांनी शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महात्मा फुले स्मारकास अभिवादन करीत श्री. मत्स्योदरी देवी चे दर्शन घेतले.दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे श्री हाके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामभाऊ लांडे, राहुल खरात, अथर काजी,अँड नाजिम सय्यद,प्रल्हाद तुपसौन्दर, विलास खरात, कैलास तुपसौदंर,रामा गवारे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. हाके म्हणाले की वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या ओबीसी-भटक्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असुन सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार सरकार घेत आहे.भटक्या विमुक्त व ओबीसींना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडे पुढील काळात पाठपुरावा करण्यात येणार असुन समाजातील साहित्यिक, संशोधक, कलावंत यांच्या कामाचे कौतुक करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.तर पारधी,डवरी गोसावी, वैदू,कैकाडी वस्ती,बंजारा तांडे,धनगर वाड्यांवर राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही राज्यभर दौरा करीत असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.