जालना – लक्ष्मण बिलोरे
कर्नाटक राज्यातून परतुर मार्गे इतर जिल्हयात अवैधरित्या टेंपो मधून जाणारा 14 लाख 40 हजार रुपये किमतीचा गुटखा परतुरचे दबंग सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र ठाकरे यांनी काल मध्यरात्री साईबाबा मंदिर चौकात, नाकेबंदी दरम्यान पकडून वाहनचालक अक्रम पाशा गालीब पाशा. रा. बंगळुरु, कर्नाटक वाहन मालक शर्मा यांच्या विरूध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने बाबत मिळालेल्या माहिती नुसार, कर्नाटक राज्यातील बंगळुरू वरुन मध्यरात्री एका टेंपोत अवैध रित्या गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती, परतुरचे सहा.पो.निरिक्षक ठाकरे यांना मिळाली, त्यांनी पो.उपनिरक्षक भागवत वाघ, पोलीस नाईक गजानन राठोड, पोलिस शिपाई गोफनवाड, पोलिस नाईक भाऊसाहेब पाऊलबुध्दे, इस्माईल शेख, शाम पांढरपोटे,बेरगुडे यांच्या मदतीने परतुर शहरातील साईबाबा मंदिर चौकाजवळ सापळा लावला असता, मध्यरात्रीच्या सुमारास वाहन क्र. एम एच 43 वाय 0044 हा टेंपो वाटुरच्या दिशेने येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सहापोनि. ठाकरे यांनी टेंपो चालकास इशारा करून थांबवला.
व गाडीच्या चालकाचे नाव विचारले असता, अक्रम पाशा नाव सांगण्यात आले.पोलीस अधिकार्यांनी टेंपोची तपासणी केली असता, त्यामध्ये पीठाच्या गोण्याची एक लाईन व त्या पाठीमागे वजीर गुटखा ठेवल्याचे निदर्शनास आले. यामध्ये 14 लाख 40 हजार रुपये किमतीचा गुटखा असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी गुटख्यासह 5 लाखाचा टेंपो ही जप्त केला आहे.
सदरील गुटखा कोणाच्या सांगण्यावरून घेवून जात असल्याचे तपासात उघड झाले नसल्याने पोलिस संशयित आरोपीची कसुन चौकशी करत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान,राज्या मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी युवा पिढी बरबाद होवू नये, हा उदात्त हेतू ठेवून संपूर्ण राज्यात गुटखाबंदी लागू केली होती. मात्र कर्नाटक राज्यातुन महाराष्ट्रात खुलेआम विक्री होत असल्याने सर्रास परतुर मार्गे गुटख्याची वाहतूक होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. गुटख्यावर कारवाई करण्यासाठी अन्न भेसळ प्रशासनास अधिकार दिले असतानाही हे अधिकारी जालनात बसून कारभार पहात असल्याने गुटख्याचा पुरवठा, राज रोसपणे विक्री होत असून
आर.आर.पाटील यांनी तरूणांसाठी केलेली ध्येयपुर्ती पूर्ण होत नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.परतुरसाठी अन्न भेसळ प्रशासनाने अधिकारी नेमले असतानाही ते इकडे फिरकत नसल्याने गुटखा व्यवसाय परतूर तालुक्यात बोकाळत चालला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वारंवार येत आहेत.