Home विदर्भ गुरांचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे व छोटे व्यापा-यांचे अर्थकारण बिघडले

गुरांचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे व छोटे व्यापा-यांचे अर्थकारण बिघडले

198

बडनेरा, चांदुर बाजार, परतवाडा व दर्यापुर येथील बाजार व शुक्रवार बाजार- सोमवार बाजार सुरु करा; जिल्हाधिकारी यांना मागणी

जिल्हा प्रतिनिधी: मनिष गुडधे.

कोरोनामुळे गतवर्षभरापासून अमरावती जिल्ह्यात भरणारे गुरांचा आठवडे बाजार आता ऐन खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावरही बंद होते. पशुपालकांसह शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे. वायदे बाजार पूर्ण करून पत टिकविण्यासाठी शेतकऱ्याना खासगी सावकाराचे उंबरठे झिजवण्यासोबतच जीवापाड जपलेले दावणीच्या पशुधनाचे मोबाईलवर सौदे उरकून आपल्या गरजा भागवाव्या लागत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळते. यंदाचा खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना खते, बी-बियाणांची चिंता भेडसावू लागली आहे. काळया आईची ओटी भरण्यासाठी जीवापाड जपलेले दावणीचे पशुधन बाजारात नेण्यास त्यांनी पसंती दर्शविली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडे बाजार बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली.
बैलांसह दुभत्या गायी, म्हशीं विकण्यासाठी ‘गाई-म्हशी खरेदी-विक्री’ नावाने व्हॉटसअप ग्रूप उघडून दहा वीस गावांतील दोन-पाच शेतकरी, दलालांना त्यात जोडुन ‘त्या’ या ग्रूपवर गुरांचे छायाचित्र पाठवून सौदे केले जात आहे. मात्र एरवी ही गुरे कवडी मोल किंमतीत विक्री होत आहे. आठवडे बाजार, ऊरुस व जत्रा हे ग्रामीण जीवनशैलीचे महत्त्वाचे अंग समजले जाते. दर आठ दिवसांनंतर ठराविक दिवशी वर्षानुवर्षापासुन भरणाऱ्या बाजाराची शेतकरी, मजुर, कामकऱ्यापासुन व्यापाऱ्यापर्यंत सर्वानाच उत्कंठा लागलेली असते. मात्र सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या बडनेरा, चांदुर बाजार, परतवाडा व दर्यापुर येथे नाव लौकिक असलेला गुरांचा आठवडे बाजार एक-दिड वर्षभरापासुन बंद असल्याने लहान मोठ्या उद्योजकांनी तयार केलेल्या अनेक वस्तू व गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या आदी जनावरांची खरेदी-विक्री थांबल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर त्याचा परिणाम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडल्याचे चित्र पाहवयास मिळते. येथे गत पन्नास वर्षापासून भरणारा गुरांचा आठवडे बाजार प्रथमच कोरोनामूळे बंद असल्याने आर्थिक व्यवस्थाच ढासळून व्यापारी, पोट व्यापारी, दलाल, पत्रा ठोकणारे, दाखले बनविणाऱ्यावर उपासमारीचा दुर्दैवी प्रसंग ओढवला गेला आहे. येथे पंचक्रोशीतील शेतकरी आपापली गुरे दावणीला मांडून त्यांच्या विक्रीतून गरजा भागवितात. परंतु यंदाच्या हंगामात प्रथमच ऐन खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावर या बाजारात शुकशुकाट पाहावयास मिळला. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागाची होरपळ सुरू असतानाच पुन:श्च दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाणारे आठवडे बाजार बंदीमुळे अर्थव्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. यात भाजीपाला, पशुधन या प्रमुख घटकांसह अन्य घटकांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंसाठी आजही येथील आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. धान्य, पालेभाज्या, पशुधनाच्या उलाढालीवर सुविधा व शिस्तीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने देखरेख ठेवली जाऊन दस्तुरीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला या मिळणाऱ्या करामुळे महसुलात वाढ होण्यास मदत मिळते. अकोला, यवतमाळ, वाशिम व वर्धा या जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार सुरु झालेले आहेत. शेतकरी व्यापारी वर्गास न्याय देण्यासाठी बडनेरा, चांदुर बाजार, परतवाडा व दर्यापुर येथील गुरांचे आठवडे बाजार व चपरासी पुरा व बडनेरा येथील आठवडी बाजार सुरु करण्या-यासाठी जिल्हाधिकारी अमरावती यांना विनंती निवेदन द्वारे केली आहे. यावेळी अनेक शेतकरी, व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.