घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय चार-सहा दिवसांत घेणार आहोत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने मंदिरे उघडण्यासाठी घाई करणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काॅलेज सुरु करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. विद्यापीठांचे कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील काॅलेज सुरु करण्याचा अहवाल शिक्षण संचालकांकडे पाठवतील. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग टास्क फोर्ससोबत बैठक घेऊ, असे टोपे म्हणाले.
ते म्हणाले, की राज्यातील सात जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी काळजीचे कारण नाही. लसीकरण वाढविले आहे. डेल्टा व्हेरियंटची लक्षणं सौम्य आहेत, मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये संक्रमणाची अधिक क्षमता आहे.
लसीकरणानंतरही संसर्ग होऊ शकतो. फक्त त्याची परिणामकारकता कमी असते. त्यामुळे लस घेतली, तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण करु शकतो. मात्र लसीचा तुटवडा असल्यावर लसीकरण बंद करावे लागत असल्याचेही टोपे यांनी सांगितले.