Home विदर्भ खोटी तक्रार करणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई करा…!

खोटी तक्रार करणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई करा…!

285

योगेश काबंळे

श्रमिक पत्रकार संघ : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन.

वर्धा  –  कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार रविराज घुमे यांच्याविरुद्ध खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागल्याने खोटी तक्रार करणाऱ्या संबंधित डॉक्टर्साविरुद्ध कारवाई करण्याची मागणी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष धीरूभाई मेहता यांना निवेदन देऊन करण्यात आली.
29 जुलै रोजी पत्रकार रविराज घुमे नातेवाईक मुलीला डेंगू झाल्याने कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन गेलेहोते. कर्तव्यावर असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर कृपाली ठाकरे, फॅनी लुईस यांनी रुग्णाला भरती घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी रुग्णाचे नातेवाईक पत्रकार रविराज घुमे आणि डॉक्टर यांच्यात वादावादी झाली. यादरम्यान घुमे यांनी प्रशासकीय अधिकारी श्री . देव आणि अधिष्ठाता डॉ. नितीन गगने यांना भ्रमणध्वनीवरून रुग्णाला भरती घेत नसून, विलंब करीत असल्याचे सांगितले. डॉ. गगने यांनी डॉक्टरला भरती घेण्यास सांगितल्याने काही वेळाने रुग्णाला भरती करण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांशी वादावादी झाली तेव्हा डॉक्टर्सना कोणत्याही प्रकारची शिवीगाळ, मारहाण, जिवे मारण्याची धमकी, कामात अडथळा निर्माण केला नसताना तसे खोटे आरोप करून डॉ. शुभम अवघाते यांनी सेवाग्राम पोलिसात 30 जुलै रोजी तक्रार दाखल केली. सेवाग्राम पोलिसांनी विविध कलमांसह महा. वैद्यकीय सेवा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे पत्रकार रविराज घुमे यांचा मानसिक छळ, आर्थिक नुकसान, सामाजिक अप्रतिष्ठा झाली. याबद्दल महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाला निवेदन देऊन खोटी तक्रार दाखल करणाऱ्या डॉक्टर्सविरुद्ध कारवाई करण्याची मागणी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.
व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीवेळी अध्यक्ष धीरूभाई मेहता,सचिव श्री . गर्ग,अधिष्ठाता डॉ.नितीन गगने, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एसपी. कलंत्री, प्रशासकीय अधिकारी श्री . देव उपस्थित होते.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, उपाध्यक्ष गजानन गावंडे आणि रमेश निमजे, सहसचिव प्रफुल्ल व्यास, रुपेश खैरी, संजय बोंडे, प्रशांत आजनकर, बाळा चतारे ,मराठी पत्रकार संघाचे प्रमोद पाणबुडे, एकनाथ चोंधरी,पत्रकार संरक्षण समितीचे योगेश कांबळे, प्रकाश झांझडे यांच्यासह विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.