जालना- लक्ष्मण बिलोरे
– लॉयन्स क्लब ऑफ जालना, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चलचिकित्सालयतर्फे शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी जालना तालुक्यातील रेवगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयात आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी परिसरातील १३ खेड्यातील ५००जणांनी नेत्रतपासणी करून घेतली, त्यापैकी ७१ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले असून, या सर्वांवर टप्प्याटप्प्याने औरंगाबाद येथील लॉयन हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लबच्या अध्यक्ष लॉ. मीनाक्षी दाड यांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ जालनाच्या प्रमुख सपना गोयल यांची तर व्यासपीठावर लाॅयन्स क्लब ऑफ जालनाच्या अध्यक्ष लाॅ मीनाक्षी दाड, सचिव लाॅ. जयश्री लढ्ढा, कोषाध्यक्ष लाॅ. प्रेमलता लोया, झोन चेअरमन लाॅ. शामसुंदर लोया, एससीए लाॅ. कमलबाबू झुनझुनवाला, उपाध्यक्ष लाॅ. राजेश भुतिया, लॉ. विजय दाड,लाॅ. विजय गिंदोडीया, लाॅ. स्मिता मित्तल, प्रकल्प प्रमुख लॉ. डॉ. गिरीश पाकनिकर, , लाॅ. अरुण मित्तल, लाॅ बळीराम बेंद्रे, लाॅ. रविन्द्र शर्मा, लाॅ व्दारकादास मुंदड़ा यांची उपस्थिती होती. या शिबिरात सहभागी पंचक्रोशीतील ५०० रुग्णांची तपासणी औरंगाबादच्या लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ. गायकवाड, डॉ. रवींद्र काळे आणि टीम तसेच जालना येथील डॉ. कुरिल यांनी केली. प्रारंभी आरटीपीसीआर, बीपी, शुगरची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या नेत्र शिबिरात ५० ते ६० वयोगटातील अनेक वृद्धांना इतर तपासण्यामुळे बीपी आणि शुगरचे निदान झाले.
जालना लायन्स क्लबच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रभावित होऊन राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रेवगाव येथील शिक्षण महर्षी अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्यावतीने क्लबला दहा हजार रुपये निधीचा धनादेश लायन्स क्लबच्या अध्यक्षा लॉ. मीनाक्षी दाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी शिबिरात सहभागी रुग्ण आणि उपस्थित नातेवाईकांना मास्क वाटप करण्यात येऊन कोरोनाकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता रेवगाव आणि परिसरात जनजागृतीपर काम करणाऱ्या दहा कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात ७१ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया म्हणाले की, लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवर शहरी भागात विशेष सेवाकार्य करत आहे. मात्र, ग्रामीण भागात खऱ्याअर्थाने सेवा कार्याची गरज ओळखून गेल्या पाच वर्षापासून ग्राम दत्तक योजनेसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढे ग्रामीण भागात विविध संस्थांच्या सहकार्याने लायन्स क्लब कार्य करणार असून, गरजूचे आशीर्वाद घेणार आहे. लायन्स क्लबच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड म्हणाल्या की, ग्रामीण भागातील या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आपण भारावून गेलो असून, यापुढे ग्रामीण भागात आवश्यक असलेले नेत्र तपासणी, सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर तसेच शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत. डोळा हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव असून, दृष्टी असेल तरच दिसेल सृष्टी, हे विचारात घेऊन प्रत्येकाने आपल्या डोळ्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हा एकच उपाय असून, लायन्स क्लबतर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी जालन्याच्या विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात असल्याची माहिती मीनाक्षी दाड यांनी दिली. सावित्रीबाई फुले एकात्म सेवा मंडळाच्या सपना गोयल म्हणाल्या की, ग्रामीण भागात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आमच्या संस्थेच्यावतीने आरोग्याबरोबरच संस्कार, शिक्षण आणि कौशल्य या विषयावर काम सुरू करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सोशल वर्कर पवन पोपळघट, कॉर्डिनेटर लोकेश पंचवाटकर, मोहन जैस्वाल आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी परिचारिका सविता सोनवणे, मोनाली पंडित, रघुनाथ नाईकवाडे, विजय उकडगावकर, शिवहर कलाने, संजय कराळे, परमेश्वर कदम, काशिनाथ गायकवाड, विठ्ठल मोरे, भरत गोल्डे यांच्यासह रेवगाव, लोंढेवाडी, तांदुळवाडी, भुतेगाव, हिस्वन, पुणेगाव, बारसवाडा, देवगाव, पिरकल्याण चिंचोली, येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.