सहकारी पोलीस कर्मचारी झाले भावुक : सजवलेली जीप दोरीने ओढुन सन्मान
कडेगाव – सतीश डोगरे
सातारा – पोलीस अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक..यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाच एका ‘दबंग आणि जिगरबाज’अधिकाऱ्याच्या निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला. निमित्त होते चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यातून कडेगाव पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांचा शुक्रवारी दुपारी १२ :३० दरम्यान झालेला निरोप समारंभ.पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्व सहकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम कडेगाव तालुक्यात प्रथमच झाला..
गेली 2 वर्षे, 2 महिने संतोष गोसावी यांनी चिंचणी( वांगी) कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते.संतोष गोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कडेगाव पोलीस ठाण्यातून बदलीहून
आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे या नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली . त्यांच्याकडे संतोष गोसावी यांनी कार्यभार दिला. त्यानंतर त्यांच्या सर्व पोलीस सहकाऱ्यांनी त्यांच्या वाहनाला दोर लावून तो ओढत आवारात एक फेरी मारली.गाडीत संतोष गोसावी यांच्या पत्नी व लहान मुलगा होता . त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. याप्रसंगी अनेक सहकारी भावुक झाले होते. कोठेही बदली झाली तरी चालेल आपले कर्तव्य चोख बजावणार असे म्हणणारा ‘दबंग आणि जिगरबाज’ अधिकारी असलेल्या संतोष गोसावी यांची म्हणाले मी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात आल्यापासून विविध प्रतिबंधक कायद्यांचा वापर करुन गुन्हेगारीवर नियंत्रण आणले.चिंचणी (वांगी) परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या प्रयत्नांना चांगली साथ दिली.यावेळी सहकारी पोलिसांनी अशाप्रकारे अनोख्या पद्धतीने निरोप दिल्याने सपोनि संतोष गोसावी भावुक झाले होते.