सुशांत आगे – पुणे
गणेशोत्सव मंडळांकडून भाविकांसाठी ऑनलाइन दर्शन व्यवस्थेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. तसेच उत्सवाच्या कालावधीतील पूजाअर्चा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे प्रसारण ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपला असून यंदा उत्सवाचा प्रारंभ १० सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोनाचे सावट उत्सवावर असून कार्यकत्यांनी तयारी सुरू केली आहे. प्रशासन तसेच पोलिसांनी दिलेल्या नियमावलीचे पालन करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय मानाच्या मंडळांसह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे. कोरोनाचा संसर्ग कायम असताना उत्सवाच्या कालावधीत गर्दी होऊ देण्यासाठी न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पुणे पोलिसांच्या परिमंडळ एक कार्यालयात पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे
प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, श्री केसरीवाडा गणपतीचे अनिल सकपाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, बाबू गेनू मंडळाचे दीपक मारणे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पदाधिकारी संजीव मारणे, जिलब्या मारुती मंडळाचे समीर शेलार, होनाजी तरुण मंडळाचे राहुल आलमखाने, नातूबाग तरुण मंडळाचे प्रमोद कोंढरे यांच्यासह मध्यभागातील २० ते २५ प्रमुख मंडळांचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिर किंवा छोट्या मांडवात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे व्यापारी बांधवांकडून वर्गणी मागण्यात येणार नाही. रस्त्याच्या दुतर्फा कमानी किंवा रनिंग मांडव टाकण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे मंडळांना जाहिरात खर्चाच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध होईल. नियमाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्या मंडळांची मंदिरे नाहीत. त्यांना उत्सवाच्या कालावधीत छोटा मांडव टाकण्यास परवानगी द्यावी, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
नियमावलीचे पालन करावे
कोरोनाचे सावट उत्सवावर आहे. मंडळांकडून नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या मंडळांची मंदिरे आहेत त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी. उत्सव कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी ऑनलाइन दर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे मंडळांच्या यांनी बैठकीत सांगितले.