प्रतिनिधी :- धनराज खर्चान
अमरावती :- पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत जि.प. पूर्व माध्य. मराठी शाळा, कान्होली येथे सहायक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री. किशोर गोवर्धन बुरघाटे यांनी लिहिलेल्या “पोशिंदा” या अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मा.ना.श्री. बळवंतभाऊ वानखडे (आमदार, दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदार संघ) यांच्या शुभहस्ते रविवार दि. 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्य शिक्षक दिनी करण्यात आला.
“पोशिंदा” हा अष्टाक्षरी काव्यसंग्रह असून यामध्ये कवयित्री बहिणाबाई यांच्या रचनाबंधाचा प्रभाव आहे. भारतीय शेतकऱ्यांची शोकांतिका हा वैश्विक चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे. गेल्या तीस बत्तीस वर्षापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. त्यामध्ये विदर्भ हा शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून भारताच्या नकाशात ओळखला जावू लागला आहे. मराठी कवी, लेखकांनी या समस्येवर प्रभावी लेखन केले आहे. श्री. किशोर बुरघाटे यांनी पोशिंद्याची व्यथा उत्कृष्ट मांडली आहे.
रात्रंदिवस खातात
ज्याच्या कष्टाचा मलींदा,
शेतकरी बाप माझा
उभ्या जगाचा पोशिंदा..!!
विविध विषयावरील कविता या काव्यसंग्रह मध्ये आहेत. त्यांची सामाजिक, राष्ट्रीय भावना तीव्र असून त्यांना सामाजिक परिस्थितीचे योग्य भान असल्याची जाणीव कवितांमधून होते. एकंदरीत “पोशिंदा” हा चांगला कविता संग्रह आहे. नवे कवी बहुतेक मुक्त छंदात लिहीतात परंतु यांनी अष्टाक्षरी काव्य प्रकार निवडला आहे व त्याला बऱ्याच प्रमाणात न्याय दिला आहे. कवीचे काव्य वाचन, चिंतन, लेखन जसजसे पुढे जाईल तशी ही कविता अधिक सुसंगत, सुरेख, अर्थपूर्ण होत जाईल असे डॉ. सतीश तराळ (ख्यातनाम कथाकार, लेखक, समीक्षक व पत्रकार) यांनी प्रस्तावना मध्ये लिहिले आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरी केली जाते. या दिनाचे औचित्य साधून “पोशिंदा” या अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा ‘मामार्पण निवास’ जनसंपर्क कार्यालय,दर्यापूर येथे रविवार दि.5 सप्टे, 2021 रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता मा.ना.श्री. बळवंतभाऊ वानखडे (आमदार) यांच्या शुभहस्ते उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. वीरेंद्र तराळ (गटशिक्षणाधिकारी,दर्यापूर) श्री. विजय विल्हेकर (लेखक व सामाजिक कार्यकर्ते) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी श्री.मुन्नाभाऊ बारब्दे (सचिव,वाकपांजर विद्यालय,थिलोरी) श्री.बबलू कराळे (प्रकाशक व ललित लेखक,दर्यापूर) श्री.सुनील लव्हाळे (पत्रलेखक) श्री.गणेश साखरे (हास्य कवि) श्री.विजय पवार (केंद्रप्रमुख,दर्यापूर) श्री.अनिल धांडे (मुख्याध्यापक,कान्होली) श्री.तुळशीदास धांडे (शिक्षक समिती,अध्यक्ष) श्री. डी.आर जामनिक (शिक्षक संघ,सचिव) श्री.दत्ता रहाटे (शिक्षक सेना,अध्यक्ष) श्री.मधुभाऊ चव्हाण (संचालक,शिक्षक बँक,दर्यापूर) श्री.अल्लाद तराळ (राष्ट्रीय कबड्डीपटू) श्री.दिलीप कोकाटे (संचालक,पंजाबराव बँक,दर्यापूर) श्री.अनिल विलेकर (स्पोर्ट क्लब,दर्यापूर) श्री.दादाराव खरड, सुनील खरड, गजानन पांडे, सुनील काळे, दिपक गावंडे श्री.गोवर्धन बुरघाटे, भागवत बुरघाटे, प्रफुल बुरघाटे (शिक्षक व मित्रपरिवार) उपस्थित होते.