Home नांदेड शिक्षणाच्या अमूल्य ठेव्याचा लाभ घेऊन मुलींनी उज्ज्वल भवितव्य घडवावं – आमदार भीमराव...

शिक्षणाच्या अमूल्य ठेव्याचा लाभ घेऊन मुलींनी उज्ज्वल भवितव्य घडवावं – आमदार भीमराव केराम

242

मजहर शेख, नांदेड

मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींना सायकल वाटप कार्यक्रम

नांदेड/किनवट – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या अमूल्य ठेव्याचा लाभ घेऊन मुलींनी आपलं उज्ज्वल भवितव्य घडवावं, असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथील बाबासाहेब मुखरे विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळेपासून 5 किमीच्या आत राहणाऱ्या इयत्ता 8 वी ते 12 वीच्या मुलींना मोफत सायकल वाटप योजनेच्या ” सायकल वापट कार्यक्रमात ” प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी तुकारामजी केशवे शिक्षण संस्था, आष्टाचे सचिव तथा मुख्याध्यापक अनंत केशवे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती कपिल करेवाड, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, केंद्र प्रमुख रमेश राठोड, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके, माहूर नगर पंचायतचे नगरसेवक गोपु महामुने, बालाजी आलेवाड उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार केराम म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीत राष्ट्रपिता जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. त्यानंतर शिक्षण अमृत पिऊन अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आपणही अशाच प्रकारे आपलं करिअर घडवावं.
गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने प्रास्ताविकात म्हणाले, मानवी निर्देशांक व महिला साक्षरतेचं प्रमाण कमी असलेल्या तालुक्यात शासनाने मानव विकास कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत 8 वी पासून मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढविण्यासाठी घरापासून शाळेत येण्यासाठी मोफत सायकल वाटप करण्यात येते. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. राजेंद्र ठाकरे यांनी आभार मानले.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आमदार भीमराव केराम यांचे हस्ते 26 मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक संदीप ईसाये, राजू भातनासे, गजानन कुडमेथे, पूर्णिमा धांदे, शुक्रलता येरेकार, मारोती खरे,आदिंनी परिश्रम घेतले.