Home नांदेड गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे आमदार भीमराव केराम यांचे आवाहन.

गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे आमदार भीमराव केराम यांचे आवाहन.

144

मजहर शेख,नांदेड

नांदेड/किनवट,दि : ९ :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवरच दि.10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. राज्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा असली तरी कोरोना संसर्गाची भिती लक्षात घेवून यावर्षीच्या गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन करून किनवट- माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी प्रत्येकाने सुखकर्ता, दुःखहर्ता श्रीगणेशाची आपल्या घरीच स्थापना करावी असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
गेल्या दिडवर्षापासून आपण सर्वजण कोरोना संसर्गाला सामोरे जात आहोत. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरतांना दिसून येत आहे. मात्र या दुसर्‍या लाटेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांसह जवळच्यांना गमावलेले आहे. दुसरी लाट ओसरत असतांनाच संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या दरम्यानच सर्वांसाठीच पर्वणीय असणारा गणेशोत्सव दि.10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज्यभरात प्रत्येकजण आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. राज्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मोठी असून जिल्ह्यातील गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र कोरोना संसर्गाची भिती लक्षात घेवून प्रत्येकाने आपआपली काळजी घेत आपल्या जबाबदारी ओळखणे क्रमप्राप्त आहे. कोणत्याही उत्सवाला माणसांशिवाय शोभा नाही. विशेषतः तर गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा सहभाग मोठ्याप्रमाणात होवून या उत्सवाला वेगळेच उधाण येत असते. 2021 चा गणेशोत्सव साजरा करतांना सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास आपण सर्वजण मिळून 2022 चा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करू अशी अपेक्षा किनवट- माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्‍वभुमीवरच दि.10 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवात प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करून श्रीगणेशाची स्थापना करत कोरोनासह राज्यावर असणारी विविध संकटे दूर व्हावीत याकरिता प्रार्थना करावी असे आवाहन केले आहे.