खबळजनक घटना….
अमीन शाह
सातारा , दि. २४ :- प्रेमात अडथळा ठरणार्या अपंग वडिलांचा पोटच्या मुलीनेच गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा तालुक्यातील आकले गावात ही घटना घडली आहे. या कामात आरोपी मुलीने प्रियकराची मदत घेतली. पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. दोघेही अल्पवयीन आहेत.
मुलीने असा केला बनाव..
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी मुलीचा भाऊ बाहेरगावी गेला होता. शुक्रवारी सकाळी मुलगी शेजाऱ्यांकडे गेली आणि वडील उठत नाहीत. त्यांना काय झाले ते, पाहा असे त्यांना सांगू लागली. शेजारी तातडीने मुलीच्या घरी गेले. त्यांनी मुलीच्या वडिलांना हलवून उठवण्यात प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या दरम्यान शेजाऱ्यांना मुलीच्या वडिलांच्या गळ्यावर व्रण दिसले. त्यांनी तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तिचा गळा आवळून खून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
पोलिसी खाक्या दाखवताच मुलीने दिली कबुली..
सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख आणि पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसानी मुलीची चौकशी केली. त्यात मुलीचे वर्तन संशयास्पद वाटले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुलीने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. प्रियकराच्या मदतीने वडिलांचा गळा आवळून खून केल्याचे आरोपी मुलीने सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.