Home वाशिम E – पीक पहाणी… आणि शेतकऱ्याची फरफट….

E – पीक पहाणी… आणि शेतकऱ्याची फरफट….

305

 

शासनाने परवा परिपत्रक काढल…१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर च्या दरम्यान शेतात जा… मोबाईल काढा…. त्यावर E – पीक पहाणी अँप डाऊन लोड करा. त्यात माहिती भरा…. सुरुवातीला आलेला ४ अंकीOTP कायमचा लक्षात ठेवा …. कोणत पीक आहे हे त्यात लिहा …. पिकासोबतचा तुमचा फोटो अपलोड करा..तलाठी ( भाऊसाहेब ) हे काम करणार नाहीत…
सगळ तुमच्या तुम्ही करा…… ‘ सगळं तुम्हीच करा…. नांगरा कोळपा….. पेरा ….. धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या….. प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड पाहिजे …..सातबारा पाहिजे ….फायदा झाल्यास सरकार डंका वाजवणार आमच्या धोरणाचं यश…. तोटा झाल्यास निसर्गावर ढकलणार किंवा शेतकरी व्यसनी असतात म्हणणार…
कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली म्हणे…. ई पीक नोंदणी …..तरीपण शासनाच्या विरोधात जायचं नाही म्हणून …….सकाळी सहा वाजता शेतात गेलो ( झक मारली ) मोबाईल काढला ई पीक पाहणी ॲप डाऊन डाऊनलोड केलं. आणि माहिती भरायला सुरुवात केली.
ओटीपी आला पटकन डायरीत लिहून घेतला .आमच्या जन्मतारखा आमच्या लक्षात राहत नाहीत…. पण हा ओटीपी आता कायमचा लक्षात ठेवायचा. त्यानंतर माहिती भरायला सुरुवात केली. नाव ,गाव, गट नंबर, सर्वे नंबर सगळ टाकून झालं.
सोयाबीन सोबत उभारून फोटो काढला पण डाउनलोड होईना कारण रेंज नव्हती .आता ही तक्रार कोणाकडे करायची. भर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान रेंज आली.
माझ्या मालकीची 77 गुंठे जमीन आहे .त्यात सोयाबीन पेरलं अशी नोंद केली….. पलिकडून मेसेज आला. तुमच्या नावाने तेवढी जमीनच नाही. खालच्या बाजूला पाहिलं सात गुंठे माझ्या नावावर जमीन….. मग प्रशासनाला फोन केला …..तिकडून उत्तर आलं टेक्निकल प्रॉब्लेम आहे .आता हा टेक्निकल प्रॉब्लेम कोण दूर करणार ….?
त्याने तर 15 प्रशासनाने तर 15 सप्टेंबर पर्यंत नोंद करण्यास सांगितला आहे .पहिलीच प्रशासनाची रीत आहे …. सरकारी काम सहा महिने थांब …..
शेतात आठ तास थांबून रेंज येत नसेल तर शेतकऱ्यांनी शेतीची काम ठेवून हेच करत बसायचं का ?
मग प्रशासन काय गवत उपटणार आहे का…?
मन उद्विग्न करणारे प्रसंग समोर येतात जर ही माहिती नाही भरली तर …..आपल्याला सातबारा मिळणार नाही …..
आपल्याला विमा मिळणार नाही …
आपल्याला कोणतीही शासकीय स्कीम राबवता येणार नाही….
या देशात शेतकरी म्हणून जन्माला आलो हा आमचा दोष आहे का ..? त्यांनी च दिलेल्या 02025712712 या हेल्पलाईन नंबरला फोन लावला फोनच लागत नाही ….
भारत हा शेतीप्रधान देश म्हणून डंका पिटला जातो आता नेमकं मी काय करायचं मी सुद्धा हतबल झालो आहे माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांची ही अवस्था तर सामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं….?
हा सवाल मला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विचारायचा आहे ….माझी सर्व वृत्तपत्राच्या पत्रकारांना हात जोडून विनंती आहे या संवेदनशील विषयावर तुम्ही तुमच्या वृत्तपत्राला वृत्तपत्रात थोडी जागा द्या आणि गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायच काम करा.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तर रौप्य महोत्सव म्हणतात की अमृत महोत्सव याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही .
फक्त शेतात अमृत पिकवणाऱ्या शेतकऱ्याला भंगार महोत्सवात विक्रीला काढू नका….

संकलन
फुलचंद भगत,मंगरूळपीर जि.वाशिम
मो.8459273206