पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष छोटू कांबळे यांची मागणी….!
चिखली : चिखली येथिल ज्येष्ठ पत्रकार समाधान गाडेकर हे वृत्तसंकलन करीत असतांना बुलडाणा गुन्हेशाखेचे पोलिसांनी त्यांना मारहाण व दमदाटी केली. तरी सदर घटनेचा पत्रकार संरक्षण समिती चिखली तालुक्याच्या वतीने जाहिर निषेध करीत त्या पोलिसांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष छोटू कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसीदार यांच्यामार्फत दि.16 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
सदर निवेदनात नमुद केले आहे की, दिनांक 14 सप्टेंबर 2021 च्या सकाळी 11.30 च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी खामगांव रोडवरील हॉटेल अमृततुल्य जवळ एका ट्रकमधून प्रवाशी वाहतुक करीत असलेल्या लोकांकडून गांजा पकडल्याची माहिती मिळताच पत्रकार समाधान गाडेकर हे वृत्तसंकलनासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेले पीएसआय निलेश शेळके, पो.कॉ.दिपक वायाळ यांनी फोटो काढण्यास मज्जाव केला. व मोबाईल हिसकावून घेत त्यातील फोटो डिलीट केले. तसेच त्यांना मारहाण, लोटपाट केली.
तरी सदर घटनेचा चिखली तालुका पत्रकार संरक्षण समितीच्यावतीने जाहिर निषेध करुन या प्रकरणी सखोल चौकशी करुन पत्रकार गाडेकर यांना मारहाण व दमदाटी करणार्या कर्मचार्यांचे निलंबन करण्यात यावे. अन्यथा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशाराही पत्रकार छोटू कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पत्रकरांवरील अन्याय खपवून घेणार नाही : छोटु कांबळे
बुलढाणा जिल्ह्यासह चिखली शहरात पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार वाढले आहेत. चोर चोर मौसेरे भाई, भ्रष्ट्राचारी एकत्र येऊन जनहिताच्या बातम्या छापणाऱ्या पत्रकारांना नाहक त्रास देत आहे.पत्रकारांचे खच्चीकरण करीत अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ ,मारहाण करण्याचे प्रकार घडवीत आहे. तरी पत्रकारांवरील अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही.यापुढे जश्यात तशे उत्तर देऊ.असा इशारा पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष छोटु कांबळे यांनी दिला.