➡️ जातीवाचक शिवीगाळ प्रकरणाचा तपास पांढरकवडा एसडीपीओ प्रदीप पाटील यांचे कडे
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमाणित केल्या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (r), 3 (1) (s), भादंवि कलम 504 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहे.
दरम्यान, चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध यापुर्वी कुर्ली येथील कंट्रोल डीलर शेख शमा शेख ईकबाल हिला संगणमत करुन 6 हजार रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी घाटंजी न्यायालयाच्या आदेशावरुन भादंवि कलम 384, 389, 506 व 34 नुसार पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणात पारवा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न करता ब वर्ग समरी फायनल सादर केला होता. सदर प्रकरण घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे, हे येथे उल्लेखनीय.
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड हे दोघेही ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारात सहभागी न करता सरपंच वर्षा कणाके हिचे सही व शिक्के याचे खोट्या पद्धतीने वापर करुन चिखलवर्धा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतले असल्याची तक्रार 5 एप्रिल रोजी सरपंच वर्षा कणाके हीने यवतमाळ येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयात केली होती.
तथापि, 13 सप्टेंबर रोजी चिखलवर्धा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने त्याच रात्री सरपंच वर्षा कणाके यांचेकडे गावातील काही स्त्री – पुरुष हे तक्रार घेऊन आले होते. त्यामुळे 14 सप्टेंबर रोजी सकाळी सरपंच वर्षा कणाके, ग्रामपंचायत सदस्य कुसुम चव्हाण, योगिता आत्राम हे तिघे मिळून गावात जात होते. तेवढ्यात उपसरपंच आकाश नडपेलवार हा गावातून बस स्टँड कडे जात होता. या वेळी सरपंच वर्षा कणाके हिने उपसरपंच नडपेलवार यांस प्राथमिक मराठी शाळेजवळ थांबवून तिने पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयात 10 मार्च रोजीच्या दाखल केलेल्या ठरारावर सरपंच नसतांना, सरपंचाची खोटी सही व खोटा व बनावट रबर स्टॅम्प कां मारला अशी विचारणा केली, त्यामुळे उपसरपंच आकाश नडपेलवार हा चिडून गेल्याने सरपंच कणाके हिला सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच तुझ्याशी जे होते ते करं म्हणुन धमकी दिली. अशा आशयाची लेखी तक्रार पोलीस अधीक्षक दिलीप पाटील – भुजबळ व पारवा पोलीस ठाण्यात रजिष्टर पोष्टाने दाखल केली होती.
➡️ दरम्यान, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळ प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करणार असल्याची माहिती, ठाणेदार विनोद चव्हाण यांनी दिली.