माणसांच्या जगात माणूस शोधणारा कवी संतोषकुमार उईके, चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या निलसनी पेडगावचे रहिवाशी असून गरिबीने पीचलेल्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे लहानपणापासूनच आई-वडिलांचे काबाडकष्ट बालवयात बघणारे, शेतमजुरी, मोलमजुरी करणे, विटा बनविणे, तेंदूपत्ता तोडणे ही सगळी कष्टाची कामे करत शिक्षणाची जिद्द अंगी धरून यशाच्या मार्गाने जाताना गरिबीचे चटके सहन करत खूप सार्या वेदना समस्या हाल-अपेष्टा पिळवणूक दडपशाही अशा संकटाचा सामना करत शिक्षकी पेशात पदार्पण करून बोलक्या जगातील सामाजिक वेदना मांडणारा काव्यसंग्रह शब्द “फुलांची शिदोरी” सामाजिक जाणिवा वर प्रकाश टाकणारा काव्यसंग्रह जन्मास घातला आहे.
“शब्दफुलांची शिदोरी” या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे असून प्रकाशक राजेश बहाळे शब्दजा प्रकाशन, अमरावती यांनी प्रकाशित केले असून याची प्रथम आवृत्ती एप्रिल 2019 ला प्रकाशित झाली आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मडावी सर यांनी दिली असून पाठराखण ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची लाभली आहे. यातल्या सर्वच कविता दर्जेदार असून लाखमोलाच्या आहेत. सामाजिक वास्तव मांडणा-या आहेत. अनेक कविता या वृत्तपत्रे,साप्ताहिके, मासिके इत्यादी मधून प्रकाशित झालेल्या व जनसामान्यांच्या दाद मिळालेल्या आहेत. कवी संतोषकुमार उईके यांच्या कविता झाडीबोली साहित्य झाडीपट्टीतील माणसांची जगणं मराठीचा पदर संगतीला घेऊन ताठ मानेने विद्रोह करीत जगासमोर यायला घाबरत नाहीत. आदिवासी कविता क्रांती घेऊन फुलणारी, वास्तव जगासमोर सांगणारी, जंगलातल्या व्यथा मांडणा-या सामाजिक आणि मानवतेचे गुणगाण गाणारी आहे.
कवी संतोषकुमार उईके हे हाडाचे शिक्षक तर आहेतच पण त्याचबरोबर समाजाच्या अनेक अंगाचा विचार करत “शब्दफुलांची शिदोरी” हा काव्यसंग्रह जन्मास घालणारे, सामाजिक समस्येची जाणीव असणारे, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे, निसर्गाच्या प्रेमात पडणारे, माणसांचा रंगढंग ओळखणारे, माणसांच्या जगात माणूस शोधणारे, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पोसणारे, शब्दांचे शस्त्र घेऊन विद्रोह करणारे,अन्यायाचा प्रतिकार करणारे, सामाजिक भान असणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कवी संतोष कुमार उईके आहेत.
समाज उध्दारा | काव्याचीच साथ |
सज्ज राहो हात | लढण्यास ||
वरील अभंगाच्या ओळीतून कवी संतोषकुमार उईके म्हणतात की शब्दांच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करू शकतो. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज इत्यादी थोर संतांनी आपल्या शब्दांच्या जोरावर समाजाचा उद्धार केला आहे. भरकटत चाललेल्या लोकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी शब्दांचे शस्त्र वापरून वार केला आहे. त्याप्रमाणेच कवी संतोषकुमार सुद्धा काव्याच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करण्यास निघाले आहेत. त्यासाठी कवीचे हात लढण्यासाठी सदैव सज्ज आहेत. त्यासाठी शब्दांची शिदोरी त्यांच्यासोबत आहे.
बोटांमधील अंगठ्यांनी
काळ बदलवता येते का?
खरंच ते घातल्याने
संकट आपले टळते का ?
हातावरच्या रेषा का
भविष्य घडवले असते
तर गरिबांचे हात
कोरडेच राहिले असते….!!
वरील ओळीतून संतोषकुमार उईके यांनी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली आहे. आजच्या विज्ञानवादी युगामध्ये बरेच लोक बोटात वेगवेगळ्या ग्रहांच्या अंगठ्या, पायात हातात काळा दोरा बांधलेले दिसतात.खरंच अशा अंगठ्या, गंडेदोरे घातल्याने काळ बदलतो का ? खरंच असे गंडेदोरे बांधल्याने अंगठ्या घातल्याने माणसावरचे संकट टळते का? हातावरच्या रेषांनी जर माणसांचे भविष्य घडवले असते तर गोरगरिबांच्या हातावरच्या रेषा कोरड्याच राहिल्या असत्या का ? गोरगरिबांना कशाला इतके कष्ट आणि श्रम करावे लागले असते असा खडा सवाल हातावरच्या रेषा दाखवून भविष्य पाहणाऱ्या भोंदू बाबांच्या नादी लागून अंगठ्या घालणाऱ्या लोकांना कवी संतोष कुमार उईके यांनी केला आहे.
जगी नाही जादू | नाही भूतबाधा
तरी लोक गधा | बनतात ||
भूतपिशाच्च हे | मानवाचे खूळ
मेंदूवर धूळ | बसलेली ||
या जगात जादू नाही. भोंदूबाबांनी आपले स्वतःचे पोट भरण्यासाठी खोटा चमत्कार करून जगाला भुलवतात भूतबाधा जादूटोणा करणे वगैरे काही नसतं तरी लोकं गाढवासारखे का वागतात ? हे भूत पिशाच्चे भोंदूबाबाने माणसाच्या डोक्यात घातलेलं खूळ आहे. कारण माणसाच्या मेंदूवर धूळ बसलेली आहे. माणूस खोट्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला लागला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कवी संतोषकुमार उईके यांच्या विचारावर नरेंद्र दाभोळकर,पानसरे,कलबुर्गी यांच्या विचारांचा प्रभाव वरील अभंगाच्या ओळी ओळीतून दिसून येतो.
कवडीमोलाने धान्य,व्यापाराला विकले मी
कर्ज फेडता फेडता, पूर्ण आहे थकलो मी….!!
तरी कर्ज काही केल्या, नाव संपाचे घेईना
पाटलाच्या कर्जातून, काही सुटका होई…..!!
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतात राब राब राबून, सावकाराचे कर्ज काढून शेतात बियाणे पेरतो. त्यात वेळेवर पाऊस येत नाही. कसेबसे आलेच धान्य तर व्यापारी कवडी मोलाने विकत घेतो. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनतो. कर्जावर कर्ज काढतो आणि फेडता फेडता थकून जातो. कर्ज संपता संपत नाही. पाटलाच्या कर्जातून सुटका होत नाही. त्यामुळे एक दिवस शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतो आणि स्वतःची जीवन यात्रा संपवितो. संवेदनशील मनाचे कवी संतोषकुमार उईके यांनी वरील ओळीतून शेतकऱ्याचं जगणं-मरणं व्यक्त केले आहे.
संवेदनशील मनाचा कवी संतोष कुमार उईके यांनी समाजातील वास्तव आपल्या कवितेतून मांडले आहे. आज हुंडाबळी कायदा होऊनही आजही हुंड्यासाठी मुलींना त्रास दिला जातो. कितीतरी मुली जाचाला कंटाळून आत्महत्या करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्रत्येक मुलीच्या बापाने मी हुंडा देणार नाही. हुंडा घेणार नाही अशी भूमिका ठामपणे बजावली पाहिजे. विवाहितेचा छळ या काव्यातून हुंडाविरोधी शब्दरूपी तक्रार कविने केली आहे. प्रत्येक पालक जागृत व्हावा यासाठी संवेदनशील व योग्य विषयाला कवींनी हात घातला आहे.
कवी संतोषकुमार उईके यांच्या सर्वच कविता या वास्तववादी व निरपेक्ष आहेत. विज्ञानवादी दृष्टिकोन मांडणाऱ्या आहेत. अंधश्रद्धेला मूठमाती देणा-या आहेत. सामाजिक समस्यांची पोल खोलणा-या आहेत. भ्रष्टाचार विरोधात लढणा-या आहेत. अनाथाबद्दल कळवळा असणाऱ्या बळीराजाची व्यथा मांडणाऱ्या आहेत. गरिबीची जाण सांगणाऱ्या, स्त्री-पुरुष समानता दर्शविणाऱ्या आणि स्वच्छतेची कास धरणाऱ्या, संताचा महिमा सांगणाऱ्या व माय मराठीची गोडी असणाऱ्या, झाडीपट्टीला न्याय देणाऱ्या व आदिमानवाला आत्मभान जागे करायला लावणाऱ्या, पोलिसांचे कर्तव्य सांगून, बहिणीवर अपार माया करणाऱ्या, बहिणीची महती सांगणाऱ्या, माय-मातीची ओढ लावणा-या या सर्वच कविता थेट काळजाला भिडणा-या आहेत. सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावा असाच हा “शब्दफुलांची शिदोरी” हा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात एकूण 83 कविता माणसातला माणूस शोधायला लावणा-या आहेत.
कवी संतोषकुमार उईके यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प. प्राथ.शाळा कोकलगाव
ता. जि. वाशिम
मो.9767663257