Home मराठवाडा बांबू लागवडीतून एकरी 2 लाख रुपये उत्पन्न शक्‍य-पाशा पटेल

बांबू लागवडीतून एकरी 2 लाख रुपये उत्पन्न शक्‍य-पाशा पटेल

549

बांबू लागवड ही बिनगड्याची शेती तर महाराष्ट्रातील पहिला इथेनॉल प्रकल्प जालन्यात शक्य

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

बांबू हा बहुगुणी वृक्ष असून, आजकाल तोट्यात असलेली शेती नफ्यात आणायची असेल तर वातावरण बदलात टीकणारी बांबू शेती ही शेतकऱ्याला समृद्ध करणारी आहे. बांबू लागवडीतून एकरी 2 लाख रुपये उत्पन्न सहज शक्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह गुंतवणूक म्हणून शेत जमीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज शनिवार दि. 2 ऑक्टोंबर रोजी येथे बोलताना केले.

      लॉयन्स क्लब ऑफ जालना, महाराष्ट्र कृषि साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुर बँक्वेट हॉलमध्ये पर्यावरण संरक्षण आणि बांबु लागवड या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात पाशा पटेल बोलत होते. यावेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, झोन चेअरमन श्यामसुंदर लोया, लायन्स क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड, सचिव जयश्री लड्डा, कोषाध्यक्ष प्रेमलता लोया, माकसुवा पदाधिकारी अतुल लड्डा, गोपाल मानधना, बालाप्रसाद भक्कड,  प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुयोग कुलकर्णी, महेश अग्रवाल, अॅड. भरत मंत्री, कमलाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले की, वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऋतुचक्र बदलत चालले आहे. पूर्वी पावसाळ्यात 70 दिवस पाऊस पडायचा. आता ही सरासरी दोन-तीन दिवसाच्या पावसाने पूर्ण होत आहे. आता दोनच ऋतू उरले असून ते म्हणजे ढगफुटी आणि दुष्काळ. अर्थात असा पाऊस म्हणजे पडला तरी विनाश आणि नाही पडला तरी विनाश असा आहे. पूर्वी 25-25 वर्षानंतर दुष्काळ पडायचा, आता वाढत्या तापमानामुळे आणि पर्यावरणाचा समतोल ढसाळल्याने भविष्यात पंचवीस- पंचवीस वर्ष दुष्काळ पडण्याची भीती पाशा पटेल यांनी व्यक्त केली.

     इंधन प्रदूषणाचे सर्वाधिक परिणाम मानव जातीवर होत असून, त्याचे मरण जवळ येत आहे. कारण 1 लिटर पेट्रोल जाळल्यास 3 किलो कार्बन तयार होतो. माणूस जात जिवंत ठेवायची असेल तर दगडी कोळसा, पेट्रोल आणि डिझेल जाळणे बंद करा, प्लास्टिकचा वापर टाळा, त्याऐवजी बांबूचे प्लास्टिक वापरा, असे सांगून जीवन उंचावण्यासाठी जीवन उद्ध्वस्त करण्याचे काम मानव जातीकडून होत आहे. दगडी कोळसाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करावा. कारण दगडी कोळसा आणि बांबूचा उष्मांक सारखाच आहे. त्यामुळे रोलिंग मिल मालकांनी  दगडी कोळसा वापरण्याऐवजी बांबूचा वापर केल्यास ही बाब पर्यावरणासाठी पूरक ठरेल. एक किलो लोखंड तयार करायला सातशे लिटर पाणी लागते. तथापि, लोखंडाचे काम आता बांबू करणार असून, बांबूपासून खुर्च्या, कपाट, चटाया आदी 1800 वस्तू तयार करता येतात, असे सांगून पाशा पटेल यांनी बांबूपासून बनवलेल्या शंभरावर वस्तू यावेळी सर्वांना दाखवल्या. दगडी कोळसापेक्षा बांबू स्वस्त आहे, अशी माहिती देऊन पाशा पटेल म्हणाले की, जगात गतीने वाढणारे एकमेव झाड म्हणजे बांबू आहे. बांबूची लागवड म्हणजे बिनगड्याची आणि बिन खर्चाची शेती आहे. पर्यावरण बदलात येणारे एकमेव झाड म्हणजे बांबू आहे. त्याला ना रोगराईची भीती आहे ना जनावरापासून उपद्रवाची, असे ते म्हणाले.  जालन्यात मोठ्या प्रमाणात रोलिंग मिल असून, व्यापाऱ्यांनी बांबू लागवड करून  बॉयलरमध्ये दगडी कोळसाऐवजी इंधन म्हणून बांबूचा वापर करून जनतेला ऑक्सीजन देण्याचे काम करावे, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले. जालना जिल्ह्यात व्यापारी आणि शेतकऱ्यांनी 1000 एकरात बांबू लागवड केल्यास दोन हजार कोटीचा टर्नओव्हर शक्य असून, एवढी लागवड झाल्यास महाराष्ट्रातील पहिला इथेनॉल प्रकल्प जालन्यात करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही पाशा पटेल यांनी दिली.

     प्रास्ताविकपर भाषणात लायन्स क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड म्हणाल्या की, नूतन कार्यकारणीने पदभार स्वीकारल्यापासून गेल्या तीन महिन्यात पूरग्रस्तांना अन्नधान्य, गोशाळेत सीसीटीव्ही, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, वाचनालयात आरोमशीन आदी उपक्रम राबविले. आज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या बांबू लागवडीवर पर्यावरणपूरक कार्यक्रम घेण्यात येत आहे.

    लॉ. अतुल लड्डा म्हणाले की शेतकरी भला तो देश भला हा उद्देश समोर ठेवून लायन्स क्लबच्या सहकार्याने माकसुवाने हा पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित केला. 45 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था असून, विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

    या कार्यक्रमाला विजयकुमार दाड, कमलकिशोर झुनझुनवाला, द्वारकादास मुंदडा, मुरारीलाल गुप्ता, यांच्यासह लायन्स क्लब कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगत घुगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिला.