आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम,मोटार सायकल रॅली
फुलचंद भगत
वाशिम : न्याय सर्वांसाठी आहे. तो गरीब असो की श्रीमंत. कायदयाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान न्यायाची हमी दिली आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष न्या. श्रीमती शैजला सावंत यांनी केले.
दि. 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायलयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आयोजित आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन न्या. श्रीमती सावंत बोलत होत्या. कार्यक्रमाला न्यायीक अधिकारी सर्वश्री एस. एम. मेनजोगे, डॉ. श्रीमती आर. आर. तेहरा, पी.पी. देशपांडे, संजय शिंदे, आर. पी. कुलकर्णी, श्रीमती एस. व्ही. फुलबांधे, पी.एच. नेरकर, एस.के. खान, अन्य न्यायीक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष ॲड. श्रीमती छाया मवाळ, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव ॲड.श्री.एन.टी.जुमळे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविकातून बोलतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. शिंदे म्हणाले, आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत शासनाच्या विविध योजना व कायदे यांची माहिती समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.प्रारंभी दीप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मोटार सायकल रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाला जिल्हा विधीज्ञ संघाचे पदाधिकारी, इतर विधीज्ञ तसेच न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि उपस्थितांचे आभार ॲड. श्री. एन.टी.जुमडे यांनी मानले.