अब्दुल कय्युम
औरंगाबाद , दि. २४ :- नकली सोने शहरातील दोन बँकामध्ये गहाण ठेवून १ कोटी ५ लाख ८ हजार ४८५ रूपयांची फसवणूक करणारया टोळीच्या मुसक्या शुक्रवारी (दि.२४) गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. या टोळीकडून पोलिसांनी बनावट सोन्याचे दागीने जप्त केले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नाथराव मुंढे, मंगेश नाथराव मुंढे, दिगंबर गंगाधर डहाळे असे बँकाना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणारया आरोपींची नावे आहेत. जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोन दिवसापुर्वी दाखल झालेल्या एका फसवणूक प्रकरणाचा तपास करतांना गुन्हे शाखा पोलिसांनी नगर अबॅन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या एका कर्मचारयाची चौकशी केली होती. चौकशीत रमेश उदावंत याने गणेश मुंढे, मंगेश मुंढे व दिगंबर डहाळे यांनी नगर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेत व महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बनावट सोने गहाण ठेवून कोट्यावधी रूपयांचे कर्ज उचलले असल्याचे सांगितले होते.
गुन्हे शाखा पोलिसांनी नगर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बनावट सोने जप्त केले असून बनावट सोने गहाण ठेवून कर्ज उचलणारया तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.