Home महत्वाची बातमी जगण्यासाठी ऑक्जीजन देणारा गझलसंग्रह म्हणजे “प्रश्न टांगले आभाळाला”

जगण्यासाठी ऑक्जीजन देणारा गझलसंग्रह म्हणजे “प्रश्न टांगले आभाळाला”

145

कविता करणं साधं काम नाही. ज्याच्या अंगात नसानसात शब्द खेळतात, शब्दच प्रेरणा देतात, शब्द जगवतात, जागवतात, शब्दच आधार देतात, शब्द जीवनाला आकार देतात, वळण घेतात, वळण देतात, शब्द जगायला शिकवतात, शब्द जमिनीची मशागत करतात, शब्दच प्रश्न विचारतात आणि उत्तरही देतात,शब्दच नवी उमेद, संजीवनी देतात तसाच गझल संग्रह म्हणजे ‘प्रश्न टांगले आभाळाला’
अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी, गझलकार नितीन देशमुख सर यांचा उत्कृष्ट गझल संग्रह म्हणजे ‘प्रश्न चांगले आभाळाला’ हा गझलसंग्रह नुकताच वाचनात आला आणि थेट काळजाला जाऊन भिडला. मला गझल येत नाही पण दुसऱ्यांची गझल वाचायला खुप आवडते. गजलेचे काही तंत्र असतात ते आत्मसात करून शुद्ध पद्धतीने गझल लिहिणे हे एका सोनाराने दागिने हाताने घडवून बनवल्या सारखीच मेहनत असते. गझलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविताच असते पण गझल थेट काळजाला भिडते. प्रश्न टांगले आभाळाला या गझलसंग्रहाचे प्रकाशन प्रतिमा पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशक दीपक चांदणे यांनी प्रकाशित केली. या गजल संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे उत्कृष्ट डबल कव्हर बांधणी आहे. मुखपृष्ठावरील चित्र मानवाच्या मनात असंख्य प्रश्न,असंख्य भाव, विचार, कविता हजारो स्वप्न होऊन झाड होऊ पाहणारी आहे. या गझलसंग्रहाचे मूल्य केवळ २५० रुपये आहे पण यातली प्रत्येक गझल थेट काळजाला भिडणारी आहे. शब्द न शब्द जगण्याची उमेद वाढवणारा आहे आणि मानवाला ऑक्सिजन पुरवणारा आहे.

जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणार्‍याला नाही
जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही

कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला
चिंता याची बघणाऱ्याला,लढणाऱ्या ला नाही

गझलकार नितीन देशमुख यांचा शब्द न शब्द फक्त वाचणाऱ्याला कळतो,पाहणाऱ्याला नाही. जो माणूस जीवन जगतो जो जीवन जगण्यासाठी अग्निपरीक्षा देतो, जो कष्ट उपसतो, वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी अंगभर कष्ट करतो, त्यालाच विस्तव करतो त्यालाच उन्हाचे चटके बसतात. बघणार्‍याला त्याचं काहीच वाटत नाही. जीवन हे फक्त जगणा-यालाच कळते. आपण कसं जीवन जगत आहोत? पळणाऱ्याला जीवनाचा अर्थ कळत नाही. आणि लढणारा माणूस हरण्याची चिंता करीत बसत नाही. तो फक्त लढतच राहतो. कोण जिंकेल कोण हारेल याची खरी चिंता बघणा-यालाच असते. लढणाऱ्या ला फक्त लढायचं माहिती असतं. असा खोल अर्थ लिहिलेला शेर संवेदनशील मनाचा कवी गझलकार नितीन देशमुख यांच्या ओळीतून दिसून येतो.

रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही
दारू कळले विकणाऱ्याला, पडणा-याला नाही.

वरील शेर म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाच्या डोक्यातल्या मुंग्या उतरवणारा आहे. दारू पिणाऱ्या माणसाने जर मन लावून हा शेर वाचला तर आयुष्यात कधी पुन्हा दारू पिणार नाही. असा अर्थगर्भित शेर प्रत्येक दारूच्या दुकानासमोर बोर्ड शासनाने लावला पाहिजे. म्हणजे दारूचे व्यसन मुक्ती केंद्राची गरज भासणार नाही. आज समाजात कित्येक लोकं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारू पिणारे लोक फक्त स्वतःच्याच जीवनाची राखरांगोळी करीत नाही तर अख्ख्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात.काही रथी-महारथी तर घरातले धान्य विकून दारू पितात. दारू मुळे कॅन्सरसारख्या आजाराला निमंत्रण देतात आणि कुटुंबाची जिम्मेदारी बायको वर टाकून अवेळी मरण पावतात. जो दारू पितो तो कशासाठी पितो कुणास ठाऊक? पिणारा रोज पितो पण त्याला दारू कळत नाही. दारू विकणार्‍याला कळते दारू पिऊन पडणाऱ्या ला नाही असा खोल अर्थ वरील गझलेतून कळतो.
कवी नितीन देशमुख यांचा गझल लिहिण्याचा फार मोठा वेगळाच हातखंडा आहे. मी आजपर्यंत अनेकांच्या गझल वाचल्या पण नितीन देशमुख सरांची काही औरच बात आहे. त्यांच्या गझल पुन्हा वाचाव्यात असे वाचकाला वाटते. प्रत्येक वेगवेगळ्या लगावली मध्ये लिहिलेल्या गझल वाचकांच्या कधी अंगवळणी पडतात कळतच नाही.गझलेतील प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असतो शंभर कविता आणि एक गझल बरोबर असते तेवढी ताकत गझलेत असते.हल्ली कुणीही उठसूठ गझल करायला लागले आहे. थोडसं तंत्र माहीत झाले की झाले गझलकार. पण मोठ्या मनाचा गझलकार, अगोदर उत्तम कवी असला पाहिजे. गझलकार नितीन देशमुख आपल्या नावाच्या समोर गझलकार किंवा कवी हा शब्द लावत नाहीत यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. एक से बढकर एक गझल नितीन देशमुख सरांच्या आहेत. गझलसंग्रह वाचावा तर नितीन देशमुख सरांचा गझल संग्रह आवर्जून वाचावा असाच आहे. कुठलाही बडेजावपणा नाही. प्रत्येक गझल वेगवेगळ्या वृत्तात व लगावलीत अगदी सराईतपणे बसवण्याचा देशमुख यांचा वेगळा हातखंडा आहे.त्यांच्या गझलेवर प्रेम करणारी विदर्भातले लाखो वाचक मंडळी आहेत.

ईश्वराने निर्मिली जर या जगातील माणसांना
माणसाच्या स्पर्शल्याने, देव अपुला बाटतो का?

जातीधर्माच्या बेड्या तोडून टाकणारा हा शेर थेट काळजाला भिडला शिवाय राहत नाही. आपण म्हणताना सगळेच म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण सोयी करताना किंवा लग्न जमवताना जात पाहिली जाते आपण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. असं प्रत्येक जण भाषणात तत्वज्ञान मानतो पण तोच मुलाचा प्रेम विवाह करण्यास नकार देतो. या जगातील सर्वच माणसांना जर ईश्वराने निर्माण केले आहे मग माणसाच्या स्पर्शाने देव बाटतो का ? असा खडा सवाल नितीश देशमुखांनी माणसातल्या माणसाला केला आहे.

पावसाने हर बळीला प्रश्न हा मुद्दाम केला
मी तुला पाऊस देतो, शेतसारा मागतो का?

आज आपण पाहतो सर्वत्र स्वार्थाने बरबटलेल्या समाजात घासपूस घेतल्याशिवाय कोणत्याच टेबलाला कोणतेच काम होत नाही. राजकारणी समाजाचा पैसा घशात घातल्या शिवाय श्वास घेत नाहीत. संस्थाचालक पैसे उकळले शिवाय नोकरी देत नाही. शेतकरी फासावर गेल्याशिवाय कर्ज माफ होत नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत स्वार्थ असल्याशिवाय कोणीही कोणालाही कवडीचीही मदत करीत नाही. पाऊस पडतो म्हणून जगाचा पोशिंदा बळीराजा जगतो आणि देशही जगवितो. तो पावसाने जर प्रत्येक बळीला असा प्रश्न केला मी तुला पाऊस देतो शेतसारा मागतो का? खूप विचार करायला लावणारा प्रश्न वरील गझलेच्या शेरातून नितीन देशमुख यांनी केला आहे. आत्मचिंतन करायला लावणारा हा शेर आहे.
‘प्रश्न टांगले आभाळाला’ हा नितीन देशमुख सरांचा गझलसंग्रहात एकूण 80 दर्जेदार गझल फुलल्या आहेत. प्रत्येक गझल व्यवस्थेला बळी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करते. जगायला शिकवते लढायला शिकवते. आत्मचिंतन करायला शिकवते. माझ्या वाचनात आजपर्यंत सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह म्हणजे प्रश्न टांगले आभाळाला हे माझ्या हाती आले आहे हे मी माझे भाग्यच समजते. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी या गझलसंग्रहाची पाठराखण केलेली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा गझलसंग्रह आहे.

कवी गझलकार नितीन देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.

समीक्षिका/शिक्षिका/लेखिका /कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव तालुका जिल्हा वाशिम
मो.9767663257

संकलन-फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206