घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
महाराष्ट्रातला शेतकरी हतबल झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर शोषण केले जात आहे.यासाठी जागर संघर्ष यात्रा सुरू आहे.ऊसाची एफआरपी ही १४ दिवसाच्या द्यावी.हा कायदा असूनही शेतकऱ्यांना एफआरपी ही कित्येक महिने मिळत नाही.यासाठी शेतकऱ्यांनी मैदानात उतरले पाहिजे.तसेच कारखानदारांनी एक दिवस कारखाना माझ्या ताब्यात द्यावा.त्याची चोरी पकडून दिल्याशिवाय राहणार नाही,असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील जागर एफआरपीचा आराधना शक्तिपीठांची या जागर संघर्षाच्या ५ व्या दिवसांच्या यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर,युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे,पक्ष जिल्हाध्यक्ष साईनाथ चिंनदोरे,जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,जिल्हा उपाध्यक्ष इरफान शेख,जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ,मयूर बोर्डे,तालुका अध्यक्ष राजेंद्र खटके,उपाध्यक्ष पांडुरंग गावडे,माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास खटके,विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख गणेश गावडे,जिल्हा कार्याध्यक्ष राधाकृष्ण मैद,सुमित हर्षे यांच्यासह प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की,यंदा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.सोयाबीन,कापूस,ऊस आदी पिक शिल्लक राहिले नाही.याची नुकसानभरपाई विमा कंपनी मिळण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची बनवली गेली आहे.विमा प्रतिनिधी यांना शेतीतील काही कळत नाही.त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कृषिची पात्रता नाही.यातून शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याचे काम केले जात आहे.
तसेच उसाची एफआरपी ही तीन तुकड्यांमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे.यात ६०-४०-४० असे टप्पे करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पैशाचा फायदा होणार नाही.एफआरपी ही १४ दिवसाच्या आत द्यावी हा कायदा असुनही कारखानदार हा कायदा पायदळी तुडवत आहेत.२६५ ही उसाची जात कृषी विद्यापीठाणे विकसित केली असूनही तो ऊस लागवड करण्यासाठी प्रतिबंध केला जातो,ही कोणती पध्दत आहे,असे ते म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की,शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी सर्व पक्षाचे झेंडे बाजूला सारून एकत्र आले पाहिजे.राजू शेट्टी हे शोषणाच्या विरोधात लढत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.ऊसाची एफआरपी ही एकरकमी मिळाली पाहिजे.नाहीतर शेतकरी हा कर्जबाजारीच राहणार आहे.येथे कुत्र्यांची संघटना होते.पण शेतकऱ्यांची होत नाही.शेतकरी अजूनही मानसिक गुलामगिरीतुन बाहेर पडले नाहीत.
आज शेतातील सडलेले सोयाबीन काढायला सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.कुठंतरी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव आला होता.परंतु केंद्र सरकारने १२ लाख टन सोयाबीन आयात केली.त्यामुळे सोयाबीनचा भाव हा कमी झाला आहे.अतिवृष्टीमुळे डागी सोयाबीन होणार आहे.शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था वाईट झाली आहे.त्यांची वयाची ४० वर्षे ओलांडली तरी त्यांना मुली भेटत नाही,अश्या विविध समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार हे निष्क्रिय असून तात्काळ मदत देण्याऐवजी पंचनाम्यांचा खेळ खेळत बसले आहेत.हा अन्याय आता शेतकरी तरुण सहन करणार नाही.सध्या संघटित होऊन मागण्यांचे दिवस गेले असून हिसकावून घेण्याचे दिवस आले आहे,असे ते म्हणाले.
यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून किशोर मरकड म्हणाले की,शासनाने शेतकऱ्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही.तरुण शेतकऱ्यांची चळवळ उभी राहत आहे.ऊसाला अनुदान,नुकसानभरपाई मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी एकता दाखवले आवश्यक आहे,असे ते म्हणाले.
यावेळी कोरोना काळात लक्षणीय काम करणाऱ्यामध्ये नवजीवन हॉस्पीटल जालना येथील डॉ.अशिष उत्तमराव राठोड,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशील जावळे,शिक्षक राजू छल्लारे,दादासाहेब शेलोटे यांचा कोरोना योध्दा म्हणून माजी खा.राजु शेट्टी यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू नाझरकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी ताराचंद पवार,बाबासाहेब दखणे,अंकुश तारख,भारत उंडे,गोरख कोल्हे,प्रसाद काळे,अभिजित काळे,गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.