मुलांना कोडी खूप आवडतात. बालपणी मुलांची बुद्धी फार तल्लख व फार चिकित्सक असते. आपल्या आजूबाजूला शेजारीपाजारी एखादे लहान मूल असते. त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की लहान मुलं खूप प्रश्न विचारतात व घरातील आई-बाबांना भंडावून सोडतात. का? असेच का? तसेच का? असे का नाही? तसे का नाही? कुठे गेला ? केंव्हा येणार? अशा प्रश्नांची मालिका सुरूच असते. काही लहान लहान मुलं तर आकाशातला चंद्रच मागतात. मग आई त्याची समजूत काढते. तो चांदोमामा आहे.आपल्यापासून खूप दूर असतो तेवढ्या लहानपणापासून चंद्र, चांदण्या,आभाळ, ढग, पाऊस, दिवस-रात्र यांच्याविषयी उत्सुकता वाढायला लागते. त्यात मुलांना खेळ, गाणी,गोष्टी,कोडी तर फारच आवडतात.अशाच विज्ञानाधारित कोड्यांची मेजवानी म्हणजे- नभाची कोडी.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील लेखक, कवी,प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचा नुकताच प्रकाशित झालेला कोड्यांचा बाल काव्यसंग्रह नभाची कोडी हा बाल काव्यसंग्रह वाचनात आला.या पुस्तकाचे मुखपृष्ठ बाल मनाला आकर्षित करणारे असून विद्यार्थ्यांची वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारे देखणे मुखपृष्ठ आहे. प्रत्येक पानावर बालकांच्या चित्रासह आश्चर्य दाखवणारे, उत्साहवर्धक,मनोवेधक चित्रे रेखाटली आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन श्री राजू बर्वे पुणे यांनी दिलिपराज प्रकाशन द्वारा केले आहे.याची प्रथमावृत्ती ५ऑगस्ट २०२१ ला प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाला प्रस्तावना प्राध्यापक, डॉ.राणे अंबरनाथ यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक डॉ.किसन पाटील जळगाव यांनी केली आहे. या पुस्तकाची किंमत 120 रुपये असली तरी यातल्या कोडे कविता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस वाढवणाऱ्या आहेत.
‘नभाची कोडी’ या पुस्तकातील सर्वच कविता कवितेचा हात धरून विज्ञानाकडे नेणाऱ्या आहेत. ज्ञानदायी आहेत. सर्व कविता या भूगोल व खगोल शास्त्राची ओळख करून देणार्या आहेत. प्रत्येक कवितेत तालबद्ध, रंजकता उत्सुकता व उत्साह भरभरून भरलेला आहे. मुलांना कल्पनाशक्तीच्या जगात घेऊन जाणार्या रहस्यमय कविता मुलांना खूप आवडतात. या पुस्तकातील भाषा कवी देवबा पाटील यांनी आकलनसुलभ, सहजरित्या, साधी, सरळ, सोपी भाषा वापरली असल्यामुळे अतिशय मनोरंजक व उत्साह वाढवणार्या या सर्वच कविता आहेत. यातल्या बर्याच कविता मोठ्यांच्या ज्ञानात भर घालणा-या आहेत.
खांब नाही
सरी नाही
दांडे नाही
टेके नाही
खाली मुळीच
पडत नाही
वर जाता
वरच जाई
आदी नाही
अंत नाही
ग्रहताऱ्यांनी
व्यापून राही
निळा निळा
त्याचा रंग
ओळखा तयास
होऊन दंग….!!
बालमनाचा उत्साह व उत्सुकता वाढवणारी कोडी मुलांना शेवटपर्यंत कोड्यात टाकणारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन बुद्धीचा कस वाढवणारी आहेत.विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून कुतूहल वाढवणाऱ्या बालकविता प्राध्यापक देवपा पाटील यांनी रचल्या आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे प्राध्यापक असले तरी लहान मुलांना समजतील अशा बालकथा व बाल कवितांचे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे खरे तर विज्ञानाचे शिक्षक परंतु लहान मुलांच्या प्रति त्यांचा असलेला लळा वाचकास दिसून येतो. प्राध्यापक देवबा पाटील यांची ‘धाडसी राम’ ही कादंबरी खूप वाचनीय व प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे ‘नभाची कोडी’ हा विज्ञानाधारित कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या अत्यंत उपयोगी आहे. ‘नभाची कोडी’ या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, चंद्र, पृथ्वी, आभाळ,संधिप्रकाश, वारा, पाऊस, गारा, इंद्रधनुष्य, ढगफुटी,उल्का, धूमकेतू, चांदण्या, सौर ऊर्जा, कृत्रिम उपग्रह, इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रत्येक कविता अतिशय मनोरंजक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करणारी आहे. या नभाची कोडी या काव्यसंग्रहामध्ये एकूण 23 कोडे कवितेच्या रुपात प्राध्यापक देवबा पाटील यांनी रचली आहेत.शेवटी प्रत्येक कोडे कवितेची उत्तरे शेवटच्या पानावर दिली आहेत.
प्राध्यापक देवबा पाटील यांची आज पर्यंत एकूण 53 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विविध पुस्तकांना अनेक पुरस्कार आज पर्यंत मिळाले असून त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असतात.नभाची कोडी हा कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालणारा असल्याने प्रत्येक घरात, प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच आहे.
प्राध्यापक देवबा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…..
समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
पीन ४४४५०५
मो.९७६७६६३२५७
संकलन:-फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206