➡️ घाटंजी पंचायत समितीच्या कामात सुसूत्रता आणण्याची गरज।
अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी पंचायत समिती ही सद्यातरी विविध विषयाने चर्चेत असून पंचायत समितीला महीला गट विकास अधिकारी लाभल्याने पंचायत समितीचे कामकाज पारदर्शकपणा व सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांत होती. परंतु नागरिकांच्या पदरी निराशा झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी पंचायत समितीच्या कामात सुसूत्रता आणण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पंचायत समिती मधील अनेक ग्रामपंचायती मध्ये १५ वित्त आयोग व पेसा अबंध पाच टक्के निधी मधून फॅगिंग मशीन, बेंच मास्क, सॅनिटायझर, हायमास्ट लाईट खरेदी करण्यात आले. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हायमास्ट लाईट बसविण्यात आले मात्र, बसविण्यात आलेले हायमास्ट लाईट हे निकृष्ठ दर्जाचे असून त्याची मूळ किंमत ३५ ते ४० हजार रुपये असतांना चक्क एक लाख रुपयाला खरेदी दाखवण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे, त्यातही ६५ ते ६० टक्के रक्कमेचे वाटेकरी कोण, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. मागील अनेक वर्षात अनेक ग्रामपंचायतीमध्ये एल.ई.डी. लाईट व हायमास्ट लाईट मध्ये लाखो रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या योजनेतील आराखड्यातील सर्व कामें सोडून हायमास्ट लाईट खरेदी करण्यात इतकी घाई ग्रामपंचायतीला कां.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हायमास्ट लाईट खरेदी घोट्याळात पंचायत समितीचे नेमके किती अधिकारी सहभागी आहे, हे पाहणे सुध्दा जरुरीचे वाटते. अनेक ग्राम पंचायत मध्ये हायमास्ट लाईट खरेदी करतांना सरपंच यांना विश्वासात न घेता व मासिक सभा व ग्रामसभेच्या विषयसुचीवर विषय न घेता हायमास्ट लाईट खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी घाटंजी पंचायत समितीला प्राप्त झालेल्या असून त्याची अद्यापही साधी चौकशी करण्यात आलेली नाही, हे येथे उल्लेखनीय. १५ वा वित्त आयोग व पेसा निधी खर्च करण्यासाठी घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असतांना, हायमास्ट लाईट खरेदी करीता परवानगीची गरज पडत नसल्याचे बोलले जात आहे. पांच हजार रूपयाच्यावर रक्कम खर्च करायचे असल्यास त्याची माहिती गट विकास अधिकारी यांना देने बंधनकारक आहे. मात्र, सबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव हे कोणतीही माहिती गट विकास अधिकारी यांना देत नसल्याची माहिती आहे. वास्तविक पाहता घाटंजी पंचायत समिती मधील घोटी, तरोडा, झटाळा, बोदडी, खापरी, ठाणेगांव, टिटवी, पारवा, जरंग, सायफळ, शरद व ईतर ग्रामपंचायतमध्ये हायमास्ट लाईट खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतच्या सरपंचानी व सबंधित गावातील नागरिकांनी हायमास्ट लाईट खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्या बाबतच्या तक्रारी सुद्धा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या असतांना त्याची साधी चौकशी करण्यात आलेली नाही, हे विशेष. घाटंजी पंचायत समिती अंतर्गत ७१ ग्रामपंचायत असून सबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या डी.एस.सी. बाबत संभ्रम कायम असून सदरच्या डि.एस.सी. ह्या पंचायत समितीच्या एक कंत्राटी संगणक समन्वयक यांच्या ताब्यात असल्याचे बोलल्या जात आहे. संबधित संगणक समन्वयक हे १५ व्या वित्त आयोगातील खर्च निधी ऑनलाईन करण्यासाठी ३ टक्के रक्कम घेत असल्याची चर्चा संबधित ग्रामपंचायत अंतर्गत सुरू आहे. घाटंजी पंचायत समिती मधील संपूर्ण ग्रामपंचायतीला डाटा ऑपरेटर असतांना त्यांना ऑनलाईनची कामे देण्यात येत नसल्याचे समजते. घाटंजी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायती पैकी केवळ ६ ग्रामपंचातीला विद्युत पुरवठा सुरू आहे. तर ईतर काही ग्रामपंचायतीला विद्युत पुरवठा बंद असल्याने ऑनलाईन कामें डाटा ऑपरेटर कुठे बसून करतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ग्रामपंचायती मध्ये ठक्कर बाप्पा योजना, तांडा वस्ती सुधार योजना, दलित वस्ती योजना व ईतर निधी नियमबाह्य उचल करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वरील कामात गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे संयुक्त बँक खाते असने अत्यंत आवश्यक असतांना मात्र, गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे संयुक्त रित्या बँक खाते नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एकंदरीत घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी पंचायत समिती कार्यालयातील कामात सुसूत्रता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.